आज २६ नोव्हेंबर. आज संपूर्ण भारतात हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. शासकीय – निमशासकीय कार्यालये, शासनमान्य – खाजगी संस्था, विविध कार्यालये याठिकाणी मोठ्या उत्साहात आजचा दिवस साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारताची भविष्यातील वाटचाल कशी असावी, भारताचे समाजकारण कसे असावे आणि सर्वसामान्य जनतेला भारताच्या वाटचालीत सहभागी करून घ्यावे, त्यांनाही स्वातंत्राचा अर्थ समजावा आणि त्यांच्यापर्यंत स्वातंत्र्य पोहचावे यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती अथक परिश्रमाने करण्यात आली. त्या संविधानाचा स्वीकार भारत सरकारने केला. म्हणून हा दिवस शासकीय स्तरांवर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
मुळात भारताच्या इतिहासात २६ नोव्हेंबर १९४९ आणि २६ जानेवारी १९५० या दोन दिवसांना खुप महत्व आहे. त्यापैकी २६ जानेवारी या दिवसापासून आपल्या देश प्रजासत्ताक बनला. पण त्यासोबत २६ नोव्हेंबर या दिवसालादेखील तेवढेच महत्व आहे. कारण अनेक चर्चा, विचारविनिमय, प्रश्नोत्तरे यानंतर २६ नोव्हेंबरला भारतीय राज्यघटना समितीने तयार केलेले भारतीय संविधान सरकारने स्वीकारले. म्हणून हे महत्त्वाचे दोन दिवस. त्यापैकी आज संविधान दिन. या संविधान दिनाच्या सर्वाना खुप – खुप शुभेच्छा.
भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीचा काळ पहिला तर भारतीय राज्यघटनेचा प्रवास हा अत्यंत खडतर झाला होता. ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य द्यायचे नक्की झाल्यावर ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या सूचनेनुसार इंग्रज सरकारने पुढाकार घेत भारताची स्वतंत्र घटना असावी यासाठी पुढाकार घेत डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १६ डिसेंबर १९४६ ला घटना समिती नेमण्यात आली. या समितीची पहिली बैठक डिसेंबर १९४६ रोजी नवी दिल्ली येथील संविधान सभागृह (आजचे सेंट्रल हॉल) मध्ये पार पडली. पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २०७ सदस्य उपस्थित होते. या घटना समितीत एकूण ११ समित्या आणि १९ समित्या होत्या. त्यापैकी भारतीय राज्यघटनेचा आरसा म्हणून ज्या समितीकडे पाहिले जाते ती समिती म्हणजे मसुदा समिती. आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली घटना निर्मितीची सुरुवात झाली. त्यानुसार भारतीय जनतेनं मसुदा समितीला सात हजार ५३५ सूचना सादर केल्या. त्यातील काही सूचना रद्द ठरवून दोन हजार ४७३ सूचनांवर सविस्तरपणे चर्चा करून रास्त सूचना स्वीकारण्यात आल्या. त्यासाठी या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या. या समितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह एकूण आठ सदस्य होते. त्यांच्या झालेल्या सभेत भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात आला. यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने २ वर्षे ११ महिने १७ दिवस या प्रदीर्घ कालावधीत घटना समितीचं कामकाज चालले. आणि ही राज्यघटना दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ ला घटना समितीच्या सदस्यांनी सरकारकडे सुपूर्द केली. त्यांनतर यावर सभागृहात चर्चा होऊन दिनांक २६ जानेवारीपासून या घटनेनुसार कार्यभार आजपर्यंत सुरू आहे. भारतीय राज्यघटनेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित घटना आहे. आणि ही घटना लिहिण्याचे काम बिहारी नारायण रायजादा यांनी केले तर घटना सुशोभित करण्याचे काम नंदलाल घोष यांनी केले.
समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. तर सध्या भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४७० कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०५ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.
जागतिक स्तरावर अत्यंत सर्वसमावेशक घटना म्हणून भारतीय राज्यघटनेकडे पाहिले जाते. त्यामुळे भारतीय इतिहास, वर्तमान आणि भविष्यात भारतीय राज्यघटनेला खुप महत्त्व आहे. आज भारतात सर्व कायदे हे घटनेनुसार चालतात. तसेच भारतात आज स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय प्रस्थपित करण्यासाठी या राज्यघटनेचा खुप उपयोग होतो. पूर्वीच्या काळी राज्यकारभार करणारा माणूस हा महाराणीच्या पोटी जन्माला यायचा; परंतु भारतीय राज्यघटनेचे यश म्हणायला हवे की, आज देशाचा राजा किंवा शासक हे सर्वसामान्य लोकांनी दिलेल्या मतांच्या अधिकारातून शासक जन्माला येतो. आणि त्याने कार्यभारदेखील दिलेल्या नियमानुसार करायचा असतो. (आता तो किती होतो हा वादाचा विषय होईल, असो.) म्हणजेच भारतात अतिश्रीमंत असणाऱ्या व्यक्तीला आणि हातावर ज्यांचे पोट असते अशा व्यक्तीला देखील मताचा समान अधिकार आहे. त्यासोबतच भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला काय अधिकार असावेत याचाही स्पष्ट उल्लेख घटनेत आहे. अजून एक महत्वाचे म्हणजे भारतीय राज्यघटनेने ज्यांना जगण्याचा अधिकार व्यवस्थेने नाकारला, ज्यांना माणूस म्हणून त्यांचे हक्क नाकारले त्यांच्यासाठी घटनेत काही कलमे राखून ठेवले आहेत. कलम ३४०, कलम ३४१ या व अन्य काही कलमानुसार आरक्षणाचा अधिकार दिला. जेणेकरून व्यवस्थेने नाकारलेल्याना पुढे येण्याची संधी मिळेल आणि झालेही तसेच. आज बऱ्याच अंशी विषमता नष्ट व्हायला मदत मिळाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यापुढील काळात आजच्या शिकलेल्या पिढीने भारतीय संविधानाला स्मरत मागे राहिलेल्या आपल्याच बांधवांना पुढे येण्याची संधी प्राप्त करून देण्याची आज गरज आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रकांड बुद्धिमत्तेच्या जोरावर या घटनेला एवढे सर्वसमावेशक बनवले आहे की, त्यामुळे समस्त भारतीयांसाठी राज्यघटना म्हणजे काळोख्या अंधारात चाचपडणाऱ्यांसाठी आशेचा व मुक्तीचा मार्गदर्शक आहे. त्यासोबतच त्यांचे खुप मोठे दूरदृष्टीपण असे की, त्यांनी या घटनेतील काही कलमे लवचिक ठेवली. जेणेकरून लोकांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या भल्यासाठी ती दुरुस्त करता येतील. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे काश्मीर मधील ३७० कलम. तत्कालीन काही पेचप्रसंगामुळे हे कलम निर्माण झाले होते. त्यावेळी देखील ज्यांनी – ज्यांनी या कलमाला विरोध केला होता त्यांच्या मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अग्रस्थानी होते. ते कलम रद्द करण्यात आले. त्याचे परिणाम येत्या काळात दिसतीलच. पण लवचिकता ही आपल्या घटनेचे अत्यंत महत्त्वाचे आणि दूरदृष्टीपणाचे उत्तम उदाहरण सांगता येईल.
ज्या घटनेच्या माध्यमातून सर्वाना समान अधिकाराच्या जोरावर भारत प्रगतीच्या दिशेने जात असताना मध्येच कुठेतरी भारताच्या अखंडतेवर आव्हाने निर्माण केली जातात. काही काळापूर्वी दिल्लीत संविधान जाळण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. माझा त्या संविधान जाळणाऱ्या समाजकंटकांना एक प्रश्न आहे की, असा प्रकार घडवून काय मिळवळत? ज्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला समान हक्क दिला, समान अधिकार दिले त्या संविधानाला जाळून काय फलित झाले. संविधान जाळण्याने संविधानाच्या प्रती संपणार; पण त्याच्याने त्यातील विचार कसे संपवणार? ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमाने आणि खुप मोठ्या त्यागातुन भारतीय राज्यघटना निर्माण केली. आपण सर्व भारतीयांनी मिळून त्या राज्यघटनेचे पावित्र्य आणि त्याचे महत्व जपले पाहिजे. येणाऱ्या पिढीला भारतीय संविधानाचे महत्व समजावे यासाठी आज सर्वांनीच याबाबत जनजागृती केली पाहिजे. त्यासाठी शासनानेदेखील यामध्ये पुढाकार घेतला आहे. त्या प्रयत्नात सगळ्यांनी मिळून काम केले तरच संविधानाचा खरा अर्थ आणि त्याची उपयुक्तता सिद्ध होईल. संविधानावर टीका वा टिप्पणी करण्यापेक्षा त्याला समजून घेणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी ते केल तर नक्कीच येणाऱ्या काळात भारत सुजलाम सुफलाम होईल यात शंका नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांवर अतिशय अभ्यासपूर्णपणे विविध कलमे घटनेत समाविष्ट केली. त्यामुळे अनेक धर्म, विविध जाती – जमाती, अनेक पंथ – परंपरा एक सूत्रात आनंदी जगताना दिसण्याचे मूळ हे भारतीय संविधानात आहे. स्त्री पुरुष समानता, समान अधिकार, शोषित – वंचित – बहुजन या सर्वांना सारखेच हक्क देतानाच प्रत्येक भारतीयांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे काम संविधानाने केले आहे. आज त्यानुसार अभ्यास होऊन मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. आजच्या संविधान दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा!
©® श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर,
मु. पो. वाटद खंडाळा ता. जि. रत्नागिरी.
संपर्क – ९७६४८८६३३० / ९०२१७८५८७४.