(खेड / भरत निकम)
तालुक्यातील बहिरवली नंबर २ मधील चौगुले मोहल्ला येथे आपदग्रस्त अश्रफ अली अहमद चौगुले यांच्या घराला वीजेच्या शाॅर्ट सर्किटमुळे आग लागून दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीमध्ये घराचे लाकूड, कौले, घरातील साहित्य, बाजाराचे सामान, अन्नधान्य, टीव्ही, फ्रीज, पंखे, घरची लाईट फिटींग, वाॅशींग मशीन, प्लास्टिकचे ड्रम, गॅस कनेक्शन, परिवाराचे कपडे, वीज मीटर, अंगणवाडीचे रजिस्टर, मुलांच्या नोंदीची कागदपत्रे, घराची कागदपत्रे असे साहित्य जळून गेले होते. संपूर्ण साहित्याची किंमत रुपये दीड लाख इतकी आहे.
घरात अश्रफअली चौगुले, त्यांची पत्नी कुबेरा आणि मुलगी मतिन असे तिघे जण वास्तव करत होते. मात्र अश्रफअली यांच्या हृदयविकार शस्त्रक्रियेसाठी सर्वजण डेरवण, ता.चिपळूण येथील वालावलकर रुग्णालयात गेले होते. त्यामुळे जीवितहानी टळली. पंचनामा करताना सरपंच इम्तियाज चौगुले, पोलीस पाटील हरिश्चंद्र कदम, उपसरपंच अहमद मुल्लाजी यांच्यासह अनेक ग्रामस्थ हजर होते.