( राजापूर )
तालुक्यामध्ये नुकतीच महसूल प्रशासनाकडून तलाठी कोतवाल भरती करण्यात आली असून पेंडखळे सजासाठी झालेल्या कोतवाल भरतीमध्ये अन्याय झाल्याचे स्पष्ट करीत याप्रकरणी पेंडखळेचे सरपंच राजेश गुरव यांनी अभय जुवळे यांच्यासमवेत बुधवारपासून उपोषण छेडले आहे. पेंडखळे तलाठी सजा कार्यालयासमोर हे उपोषण त्यांनी छेडले असून या उपोषणाला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
दरम्यान, खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांनी उपोषणस्थळी शिवसेनेच्या पदाधिकार्यांसह आपली भेट घेवून उपोषणासंबंधित सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे राजापूर विधानसभा संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, रत्नागिरी जिल्हा समन्वयक दिनेश जैतापकर, विधानसभा मतदारसंघ समन्वयक प्रकाश कुवळेकर, विभागप्रमुख संतोष हातणकर यांच्यासह पेंडखळेचे ग्रामस्थ, शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
महसूल प्रशासनाचा कोणीही प्रतिनिधीने दुपारपर्यंत उपोषणास्थळी आपली भेट घेतली नसल्याची स्पष्ट करीत श्री. गुरव यांनी त्याबात तीव्र नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत उपोषणावर आपण ठाम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महसूल प्रशासनातर्फे तालुक्यामध्ये तलाठी कोतवाल भरती करण्यात आली आहे. त्यामध्ये पेंडखळे तलाठी सजासाठीही कोतवाल भरती करण्यात आली. गेल्या कित्येक वर्षापासून रिक्त असलेल्या या सजामध्ये कोतवाल पदाची सर्व कामे अभय जुवळे हे ग्रामस्थ तात्पुरत्या स्वरूपात काम करीत होते. भविष्यामध्ये होणार्या कोतवाल भरतीमध्ये आपणाला संधी मिळेल असे त्या-त्यावेळी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी आश्वासित केले होते. सुमारे तेरा ते चौदा वर्ष तात्पुरत्या स्वरूपात कोतवाल म्हणून काम केल्याने श्री. जुवळे यांच्याकडे येथील कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. कोरोना काळातही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
या सार्याचा विचार करून कोतवाल भरतीमध्ये श्री. जुवळे यांना प्राधान्य मिळावे अशी मागणी सरपंच श्री. गुरव यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. पेडखळे तलाठी सजासाठी श्री. जुवळे यांची कोतवाल म्हणून नियुक्ती न झाल्यास त्याविरोधात उपोषण छेडण्याचा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला होता. त्यांच्या या निवेदनावर महसूल प्रशासनाकडून कोणतेही सकारात्मक कार्यवाही झालेली नसल्याने आजपासून पेंडखळे तलाठी सजा कार्यालयासमोर त्यांनी आमरण उपोषण छेडले आहे.
या आंदोलनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याची माहिती श्री. गुरव यांनी दिली. दरम्यान, खासदार श्री. राऊत, आमदार श्री. साळवी यांनी शिवसेनेचे राजापूर विधानसभा संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, रत्नागिरी जिल्हा समन्वयक दिनेश जैतापकर, विधानसभा मतदारसंघ समन्वयक प्रकाश कुवळेकर, विभागप्रमुख संतोष हातणकर यांच्यासमवेत उपोषणस्थळी जावून श्री. गुरव आणि सहकार्यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थ, शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.