(खेड)
कठोर कायदे, आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा करुनही महिलांवरील अत्याचार थांबताना दिसत नाही. अशात आता खेड येथे दिवसाढवळ्या घडलेल्या एका घटनेने महिलांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालं आहे. कॉलेजमधून घरी जाणाऱ्या तरुणीला ट्रक चालकाने ओढून गाडीत खेचण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवार, दि.21 रोजी सायंकाळी मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटाच्या पायथ्याशी वेरळ गावात ही धक्कादायक घटना घडली.
ट्रकमध्ये खेचताना या तरुणीच्या गळ्याला जखमा झाल्या आहेत. तरुणीने आरडा ओरडा केल्यानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर वेरळ गावानजीक भोस्तेघाटाच्या पायथ्याशी दिवसाढवळ्या धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजमधून घरी चालत जाणाऱ्या एका तरुणीला एका ट्रकचालकाने तिच्या जवळ ट्रक थांबवून तिला ट्रकमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला.
या झटापटीत त्या कॉलेज तरुणीच्या मानेला आणिगळ्याला दुखापत झाली. त्या तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी धावून आले. त्यानंतर त्या ट्रकचालकाने ट्रक त्या ठिकाणीच सोडून घटनास्थळाहून पोबारा केला. वेरळ गावातील ग्रामस्थांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पळून गेलेल्या त्या ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.