(दापोली)
तालुका कृषी विभागाने यावर्षी ११० वनराई बंधाऱ्यांचे लक्ष्य ठेवले आहे. गतवर्षी कच्चे, विजय वनराई असे १०० बंधारे बांधण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
‘पाणी अडवा पाणी जिरवा’ संकल्पनेतून कृषी विभाग, पंचायत समिती, कोकण कृषी विद्यापीठ आदी संस्थांच्या माध्यमातून पावसाळा संपला की, नदीकिनारी पाणी अडवण्यासाठी पक्के, कच्चे, विजय, वनराई बंधारे बांधले जातात. यावर्षीही नदीकिनारी बंधारे बांधण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
पंचायत समितीच्या मार्गदर्शनानुसार, ग्रामपंचायती यामध्ये सहभाग नोंदवून शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून बंधारे बांधत आहेत. दापोली कृषी विभागाने यावर्षी ११० वनराई बंधाऱ्याचे लक्ष्य ठेवले असून, त्यांच्या पूर्ततेच्यादृष्टीने कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. वेळीच पाणी अडवल्याने उन्हाळ्यात पाणीसमस्येची तीव्रता कमी करण्यास मदत होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.