(गुहागर)
कोकणातील शेतकऱ्यांच्या शेती बागायतीसाठी होणाऱ्या वानर, माकडे यांच्या प्रचंड उपद्रवामुळे त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप गावातील एक प्रगत शेतकरी अविनाश काळे यांनी ५ आॅक्टोबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यांना सर्वच स्तरातून वाढता पाठिंबा मिळत होता. कोकणातील सर्वच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा ज्वलंत प्रश्न असल्यामुळे इतर जिल्ह्यांतील शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात स्वतःहून रत्नागिरी येथे जाऊन अविनाश काळे यांच्या बेमुदत उपोषणात सहभागी होत होते. कोकणातील या ज्वलंत समस्यात सक्रिय सहभागातून प्रत्यक्षात आवाज उठवून वाचा फोडल्या बद्दल अविनाश काळे यांचे अभिनंदन आणि आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. परंतु पुढे काय ?
सदर उपोषणाच्या दुसर्या दिवशी राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. उदय सामंत यांनी उपोषणकर्ते अविनाश काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची त्यावेळी घटनास्थळी जाऊन भेट घेतली होती. या भेटीच्या वेळी तुमच्या आणि कोकणातील तमाम शेतकऱ्यांच्या भावनांची जाण आम्हाला आहे. सध्या लंडन येथे विदेश दौऱ्यावर असलेले वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार हे मायदेशी परत आल्यावर सर्व परिस्थिती त्यांना समजावून सांगतो आणि आपण लवकरच तुमची सर्व शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेऊन चर्चा करू आणि या समस्येवर मार्ग काढू, तो पर्यंत आपण उपोषण मागे घ्यावे. त्यांच्या या मध्यस्थीमुळे दिड दिवसातच अविनाश काळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपोषण मागे घेतले. पुढे सरकार दरबारी चर्चा होऊन कोकणातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे वाटले होते. परंतु आजतागायत शासनाच्यावतीने शेतकर्यांसोबत कोणत्याही प्रकारची चर्चात्मक बैठक करून ठोस निर्णय घेतलेला दिसत नाही.
कोकणातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता असे कळते की, आम्ही विविध भागात सर्वे करून त्या भागातील शेतकऱ्यांच्या सुचना लेखी निवेदनाद्वारे वरिष्ठांकडून शासन दरबारी पाठविलेल्या आहेत. परंतु शासनाकडून काही ठोस निर्णय व उपाय योजना अजून पर्यंत आलेल्या नाहीत. सद्या फक्त रत्नागिरी येथील उपोषणकर्ते शेतकरी अविनाश काळे यांच्या गोळप गावी प्रायोगिक तत्त्वावर माकडे/ वानर पकडण्यासाठी पिंजरा दिलेला आहे. त्यात फक्त दोन/तीन वानर सापडल्याचे समजले. परंतु त्यांना नेऊन सोडायचे कुठे ? हा मोठा जटिल प्रश्न उपस्थित होतो आहे.
सदर बाबतीत कोकणातील शेतकऱ्यांकडून प्रामुख्याने येणाऱ्या सुचना व उपाय योजना आहेत – १) गावीतील प्रत्येक वाडीवस्तींवर माकडे /वानर पकडण्यासाठी अद्ययावत सुविधांसह पिंजरे द्यावेत सोबतच वन विभागाने प्रशिक्षित वन कर्मचारी द्यावेत. त्यांच्या मदतीने वानरांना पकडून प्राणीमित्रांच्या सहकार्याने दूरवर अभयारण्यात नेऊन सोडवेत. २) प्रत्येक शेती-बागायत शेतकऱ्यांना शासनाने मोफत लायसन्सधारी बंदूक उपलब्ध करून देण्यात यावी आणि उपद्रवी प्राणी मारण्याची मुभा देण्यात यावी. ३) सर्व वानर /माकडे पकडून त्यांची नसबंदी करण्यात यावी. यामुळे त्यांचे यापुढील प्रजनन वाढणार नाही. परंतु सद्याची त्यांची संख्या ही गावांतील माणसांपेक्षा जास्त वाढलेली आहे. शेती, बागायती बरोबर घरांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचं काय करणार ?
सद्या तरी शेतकऱ्यांच्या या सुचना व उपाय योजनांबाबत कोकणातील सर्वच लोकप्रतिनिधी राज्यकर्त्यांसह प्रशासनाने पर्यायाने शासनाने दुर्लक्ष करून चालणार नाही. याबाबतीत वेळीच ठाम/ठोस निर्णय घेऊन उपाययोजना करणे अतिशय गरजेचे आहे. कोकणातील शेतकर्यांच्या भावना तीव्र होत चालल्या आहेत. त्यामुळे शेती, बागायतींचे नुकसान करणाऱ्या वानर, माकडे आणि उपद्रवी वन्य पशू रानडुक्कर यांचा कायमचा बंदोबस्त व्हावा व भयमुक्त शेती, बागायत करता यावी यासाठी शासनाने ठाम व ठोस निर्णय घेऊन उपाययोजना करणे काळाची गरज आहे नाही तर कोकण उद्ध्वस्त होईल. अशा परिस्थितीत शेतकरीवर्गच कायदा हातात घेऊन स्वतःच योग्य ती ठोस उपाययोजना करतील, अशी शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे शासनानेच या ज्वलंत समस्येवर वेळीच ठोस निर्णय घेऊन योग्य त्या उपाययोजना राबवून कोकणातील पिडीत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जनार्दन आंबेकर, सरपंच, ग्रामपंचायत उमराठ( गुहागर ) यांनी केली आहे.