(देवरुख / प्रतिनिधी)
भवतालाचे भान देणाऱ्या ऋतुसंवाद या मातृमंदिर देवरुख संस्थेच्या ४ दिवसीय निवासी शिबिराला गुरुवार १६ नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली. मातृमंदिरच्या २४ एकरच्या निसर्गरम्य परिसरात मुंबई, सांगली, कोल्हापूर, कणकवळी, सावंतवाडी, गुहागर, रत्नागिरी आणि देवरुख परिसरातून आलेल्या शिबिरार्थीच्या सहभागाने शिबिरात उत्साह आणला आहे.
ऐतिहासिक वारसा वास्तू संवर्धक मृदुला माने यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. उदघाटन कार्यक्रमात संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी शिबिराची संकल्पना व मातृमंदिरचा वारसा याबाबत मांडणी केली. मानवाची मूळ प्रेरणा असलेल्या निसर्गाचा कनेक्ट आपल्याला वाढावावा लागेल नाहीतर सगळं जग केवळ फॅक्टरी बनेल असं त्यांनी सांगितलं. प्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांनी व्यासपीठावरून बोलताना मी मातृमंदिरची लेक आहे असं सांगत मातृमंदिर सोबतचा त्यांचा कनेक्ट मांडला. स्वतः शिबिरातून घडलेले असल्याच सांगत अशा प्रकारची चांगली शिबीरे मुलांमधला चांगला माणूस घडवत असतात, यामध्ये ज्यास्तीत ज्यास्त सहभाग घेतला पाहिजे असं त्यांनी सांगितले. रत्नागिरी आर्ट सर्कलचे संवेदनशील व समाजभान असलेले कलाकार नितीन कानविंदे यांनी सध्याच्या वातावरणात योग्य आणि सरळ मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाल्याने अशा प्रकारची शिबीरे मोठ्या वयोगटासाठी म्हणजेच पालकांसाठी देखील घ्यावी अशी सूचना मातृमंदिरला केली. शेवटी उदघाटक मृदुला माने यांनी शिबिराची संकल्पना आणि परिसर इतका सुंदर आहे कि स्वतःला मुलांच्या जागी असायला आवडेल असं सांगून शिबिराला सदिच्छा दिल्या.
शिबिराचे पहिलं सत्र वारसा वास्तू संवर्धक मृदुला माने यांनी घेतलं. मृदुला माने या महाराष्ट्र शासनाच्या गड किल्ले संवर्धन समितीच्या सदस्य आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज म्युसियम च्या माजी मानद डायरेक्टर होत्या. देवरुख येथील म्युसियमच क्यूरेशन त्यांनीच केलेलं आहे. आपल्या परिसरातील वारसा वास्तू व पर्यावरण असा संदर्भ घेत सुरु केलेला संवाद वारसा वास्तू, त्याचं आर्किटेक्चर आणि यातील नवीन तंत्रज्ञान इथपर्यंत चांगली चर्चा झाली. नवीन विषय असल्याने मुलांनी खूप प्रश्न विचारून विषय समजून घेतला.
शिबिराचा पहिला दिवस असल्याने शिबिरार्थीच्या ओळखीचं सत्र एका ऍक्टिव्हिटी च्या माध्यमातून घेतलं गेलं.देवरुख येथील प्रसिद्ध चित्रकार विक्रम परांजपे यांनी चित्रकाराच्या नजरेतून ऋतुबदल या विषयावर शिबिरार्थिंशी संवाद साधला. चित्रकला हा मुलांचा आवडता विषय निसर्गातील घटकांशी जोडत त्यांनी या विषयातील अनेक नवीन संकल्पना त्यांनी स्पष्ट केल्या.
संध्याकाळी शिबिरात घेतले जाणारे अनोखे खेळ आणि अध्ये-मध्ये घेतली जाणारी धम्माल गाणी शिबिरार्थीचा उत्साह टिकवून ठेवतात.रात्री सुमित फडणीस यांच आकाश दर्शनचे सत्र झालं. मातृमंदिर फार्ममधल्या निरव शांततेत काळोख्या गच्चीवरून झालेले हे आकाशदर्शन चे सत्र मुलांना फार आवडले. या सत्राच्या माध्यमातून आकाश -अवकाशाचे भान देतानाचा या विषयाशी जोडलेल्या अंधश्रद्धा यावरचं प्रभावी मार्गदर्शन सुमित फडणीस यांनी केले.या चार दिवसीय शिबिराचा समारोप रविवारी दुपारी होईल. यादरम्यान निसर्गाशी जोडून घेवून भवतालाचे भान देणाऱ्या विविध विषयाचे उपक्रम व सत्र होतील.