(कोलकाता)
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा दुसरा सेमीफायनल सामना खेळला गेला. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फंलदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने डेव्हिड मिलरच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 213 धावांचे लक्ष्य ठेवलं होते, जे कांगारूंनी 7 विकेट्स गमावून 215 धावा करत अवघ्या 47.2 षटकांत पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून पराभव केला आणि विक्रमी आठव्यांदा एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. आफ्रिकन संघ पराभूत होऊन पाचव्यांदा विश्वचषकातून बाहेर पडला आहे. आता पाचवेळा विश्वविजेता कांगारू संघ रविवारी अहमदाबादच्या मैदानावर यजमान आणि दोन वेळचा विश्वविजेता भारताशी भिडणार आहे.
गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने अवघ्या 48 चेंडूत 62 धावांची शानदार खेळी केली. हेडने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार मारले. वॉर्नरनेही 18 चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 29 धावांची तुफानी खेळी केली. या दोघांनी अवघ्या 37 चेंडूत 60 धावांची सलामी भागीदारी करत ऑस्ट्रेलियासाठी धावांचे आव्हान सोपे केले. मात्र, अखेरीस पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने संघाला विजयापर्यंत नेले. स्टार्क 38 चेंडूत 16 धावा करून नाबाद परतला आणि कमिन्स 29 चेंडूत 14 धावा करून नाबाद परतला.
आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झी आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. कागिसो रबाडा, एडन मार्कराम आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Australia won a nail-biting contest in Kolkata to secure a place in the final of the #CWC23 👏#SAvAUS 📝: https://t.co/1iPjdYnIe3 pic.twitter.com/NPjiWIDTGT
— ICC (@ICC) November 16, 2023