(मुंबई)
झिकाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. मागील दोन महिन्यात राज्यात झिकाचे पाच रुग्ण आढळले आहेत. इचलकरंजीमध्ये दोन तर पुणे, पंढरपूर आणि कोल्हापूरमध्ये झिकाचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. पुणे शहरातील येरवडा परिसरातील 64 वर्षीय महिला झिका व्हायरस पॉझिटिव्ह आढळली आहे. सदर महिलेला 5 नोव्हेंबर रोजी ताप आला होता. त्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने 10 नोव्हेम्बर रोजी तपासणीसाठी एनव्हीआय मध्ये पाठविण्यात आहे होते. 11 नोव्हेंबर रोजी अहवाल झिका पॉझिटीव्ह आला.
शेजारील कर्नाटकमध्येही या आजारांची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहे. वाढता झिकाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. झिका रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाणही अत्यंत नगण्य आहे.
ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये दाखवावे. कोणताही ताप अंगावर काढू नये. या आजारासाठीचे सर्वोत्तम निदान व उपचार सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनीही झिकाचे लक्षण असलेले रुग्ण आल्यास त्यांचा नमुना सरकारी यंत्रणेमार्फत पुण्यातील एनआयव्ही येथे तपासून घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
झिका विषाणूचा संसर्ग हा डासांच्या एडीज प्रजातीद्वारे पसरतो. एडीज डासांमुळं डेंग्यू आणि चिकनगुनिया विषाणू देखील पसरतात. मात्र हा आजार जीवघेणा नाही. एडिस डास डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजारांचाही प्रसार करतात. एडिस इजिप्त व एडिस अल्बोपिक्टस डासांच्या चावण्याद्वारे तो मानवी शरीरात प्रसारित होतो. त्याशिवाय झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीशी लैगिंक संबंध, रक्तसंक्रमण आणि गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मादरम्यान संक्रमित आईपासून तिच्या बाळामध्ये तो पसरू शकतो. हा आजार विषाणूसारखा असला, तरी तो वेगाने पसरत नाही. झिका विषाणूचा संसर्ग रोखण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे डासांपासून संरक्षण होय.
झिकाची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यूसारखी असतात. ताप, अंगावर पुरळ उठणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात. ती दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात. झिकाचे निदान व उपचार नवी दिल्लीतील राष्ट्रीय रोग निदान संस्था, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे झिकाच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे.
झिका आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करणे आवश्यक आहे. झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांला डॉक्टर ताप किंवा डोके दुखीसाठीच्या औषधाची शिफारस करतात. तसंच, अधिक आराम करण्याचा सल्ला देतात.