(खेड / भरत निकम)
महामार्गावरील लोटे पटवर्धन भागातील मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. पोलिस पथकाने ही कारवाई केली असून १२०३ रुपये किंमतीचे जुगार साहित्य जप्त केले आहे. तसेच जुगार खेळवणारा सचिन सुरेश जाधव याला ताब्यात घेऊन त्याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
खेड शहरात भरणे भागात मोठ्या प्रमाणात मटका जुगार खेळ खेळवला जातो. मात्र स्थानिक नागरिकांनी कारवाई करण्याची मागणी करुनही पोलिस खाते या व्यावसायिकांवर कारवाई करत नाहीत अशी चर्चा आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांनी सुरुवातीच्या काळात गोवा बनावट दारुसह गावठी हातभट्टी दारु धंद्यावर कारवाई केली होती. तर जुगार मटका खेळावरही बंदी घातली होती. मोठमोठ्या कारवाईचा धडाकाही त्यांनी लावला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई थंड पडली असल्याचे दिसून येत आहे. अशा कारवाई करण्यावर कुणी बंधन घातले की, अवैद्य धंदे सगळे बंद पडले, असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत.
भरणे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवारात मटका जुगार खेळविण्यात येत असल्याचे दिसून येते. हा संपूर्ण प्रकार खूप गंभीर असून अनेक जुगार खेळणारे, गर्दुल्ले, मद्यपी शाळेच्या परिसरात फिरत असतात. त्यांच्या आरडाओरडा या भागात खूप असतो. मात्र याची दखल घेतली जात नाही, असे चित्र असल्याचे स्थानिक सांगतात.
जिल्ह्यासह स्थानिक पोलिस प्रशासन अवैद्य धंदे बंद करण्यासाठी कारवाई करीत आहेत. मात्र यावर ठोस कारवाई होताना दिसत नसून दोन ते तीन दिवसांनंतर पुन्हा हे धंंदे सुरु होत आहेत. काही राजकारणी अवैद्य धंदे सुरु रहावेत, म्हणून पोलिस खात्यावर दबाव आणत आहेत का, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. गावठी हातभट्टी धंद्यांवर कुणीही कारवाई करु नये, असे कुणी तरी राजकीय व्यक्तीने पोलिस प्रशासनाला सांगितले आहे की काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. गावठी दारु, मटका जुगार, गोवा बनावट दारु, इंग्लिश दारुची खुलेआमपणे विक्री होतं आहे. मात्र पोलिस ठाण्यासह इतर खाते अशा धद्यांबाबत कठोर भूमिका घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.