नामस्मरण भक्ती
उफराट्या पद्धतीने रामनाम घेऊही वाल्मीक ऋषी तरला. सहजपणाने त्याने रघुनाथांचे शतकोटी श्लोकांचे चरित्र लिहिले. हरीनाम घेऊन प्रल्हाद तरला. नाना आघातांपासून सुटला. नारायणा नाम घेऊन अजामिळ पावन झाला. हरिनाम नामामुळे पाषाण तरले. असंख्य भक्त उध्दरले. महापापी होते तेही परमपवित्र झाले. परमेश्वराची अनंत नामे आहेत ती नित्यनेमाने घेतल्यावर माणूस तरतो. नामस्मरण केल्यावर यम देखील त्रास देत नाही. विष्णुसहस्रनाम घेतल्याने सार्थक होते. नामाचे स्मरण केल्याने आपण पुण्यश्लोक होतो. काहीही न करता फक्त रामनाम वाणीने जपले तर तेवढ्यानेही चक्रपाणि संतुष्ट होऊन भक्ताला सांभाळतो. नित्य नामाचे स्मरण करतो ते पुण्यशरीर जाणावे. पर्वताप्रमाणे महादोष राम नामामुळे नष्ट होतात.
नामाचा महिमा अगाध आहे. तो वर्णन करता येत नाही. त्यामुळे खूप लोक तरले आहेत. प्रत्यक्ष चंद्रमौळी म्हणजे शंकर देखील रामनामामुळे तरला. हलाहलापासून मुक्त झाला. चारही वर्णांना नामाचा अधिकार आहे. नाम घेण्यासाठी लहान-थोर असं काहीही नसतं. जड मूढ देखील नामामुळे पैलपार जातात म्हणून म्हणून अखंड नाम स्मरावे. परमेश्वराचे रूप मनामध्ये आठवावे. अशाप्रकारे तिसरी भक्ती वर्णन केली आहे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नामस्मरण भक्तीनाम समास तृतीय समाप्त
श्रीराम
दशक चौथा समास चौथा पादसेवन भक्ती
मागे नामस्मरणाचे लक्षण निरूपण झाले आता चौथी भक्ती असलेल्या पादसेवन भक्तीची माहिती घेऊ या. पादसेवन म्हणजे काया वाचा मनाने सद्गुरुच्या चरणांची सेवा करावी करावी त्यामुळे सद्गती मिळते. पादसेवन भक्तीमुळे जन्म-मरण यातायातीपासून सुटका होते. सद्गुरूच्या कृपेशिवाय तरणोपाय नाही. त्यामुळे वेळ न लावता सद्गुरूचे पाय धरावे. सद्गुरु सदवस्तू दाखवतो. सारासार विचार करण्यास लावतो, परब्रह्माचा निर्धार अंतरामध्ये वसवतो. जी वस्तू डोळ्यांना दिसत नाही आणि मनालाही जाणवत नाही, ‘मी’पणाचा त्याग केल्याशिवाय अनुभवाला येत नाही. अनुभव घेतल्यावर मी पण नाहीसे होते मी पण असेल तर अनुभव येत नाही हे अनुभवी लोकांनाच माहिती आहे. इतरांच्या मनामध्ये गोंधळ होतो, त्यांना माहिती नाही. अहंकाराचा त्याग आणि आत्मनिवेदन आत्मसमर्पण यामुळे विदेह स्थिती, अलिप्तपणा प्राप्त होतो. मनातीत अवस्था प्राप्त होऊन स्वस्वरूपाचा अनुभव येतो. यापेक्षाही वेगळे अनुभवाचे स्वरूप समाधानाची संकेत वचने, पादसेवनामुळे लक्षात येतात. वेद, वेद गर्भ वेदांत, सिद्ध सिद्ध भावगर्भ सिद्धांत अनुभव, धादांत सत्य वस्तू म्हणजे ज्या गोष्टी सांगता येत नाहीत अशा गोष्टी अनुभवाच्या अंगाने संतांच्या सहवासाने भक्तीचे प्रसंग गुपित प्रकट होते. प्रकट झाले तरी ते नसते, गोप्य असुनही असते आणि भास आणि आभास याच्यापेक्षाही ते वेगळे असते. हाच गुरुगम्य मार्ग होय. यालाच अंतरिक्ष म्हणजे आत पाहण्याचा मार्ग असे म्हणतात. हा मार्ग मनबुद्धीस न समजणारा असल्याने त्याला अलक्ष असे म्हणतात.
ज्याच्याकडे लक्ष द्यावे, ज्याचे ध्यान करावं तेच आपण होऊन जातो व शास्त्र प्रतीती, गुरु प्रतीती व आत्म प्रतीती आपल्याला होते. अशाप्रकारे हे अनुभवाच्या द्वारे सत्संग करून सत्य उत्तर प्रत्ययाला येते. सत्य पाहिले गेले तर असत्य नसते ते सत्य असते, असत्य पाहायला गेले तर सत्य नसते ते असत्य असते. सत्य-असत्य कृत्य कोणते ते पाहणाऱ्याला समजते. पाहणारा, पाहणे आणि जे पाहत आहे ते या तिघांचे मिलन झाले तर तद्रूपता येते. मग समाधान मिळते. अशा प्रकारचे समाधान सद्गुरुकृपेमुळे मिळते सद्गुरुविना सन्मार्ग सापडत नाही. प्रयोग, साधने, सायास, नाना विद्या अभ्यास भरपूर काही आहे पण गुरूवाचून काही मिळत नाही. अभ्यास करूनही अभ्यासता येत नाही जे असाध्य साधन आहे ते सद्गुरुवाचून काय समजणार? असा प्रश्न समर्थ रामदास स्वामी महाराज विचारतात. या गुरु पादसेवन भक्तीचा पुढील भाग आपण पुढील कथेमध्ये ऐकुया.
-पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127