(रत्नागिरी)
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे कामकाज अत्यंत प्रभावी आहे. संस्थेची आर्थिक आकडेवारी प्रामुख्याने भरभक्कम स्वनिधी, सातत्यपूर्ण वसुली, निधीची केलेली संपूर्ण गुंतवणूक, संस्थेची उपक्रमशीलता हे सर्व पाहून खूप समाधान झाले असे मत सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी व्यक्त केले.
आज स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या पावस शाखेला सदिच्छा भेट देण्यासाठी आयुक्त अनिल कवडे तसेच अतिरिक्त आयुक्त शैलेश कोथमिरे, लेखाधिकारी श्री.कुळकर्णी, जिल्हा उपनिबंधक डॉ.सोपान शिंदे यांनी भेट दिली. त्या प्रसंगी आयुक्त कवडे तसेच शैलेश कोथमिरे व श्री.कुळकर्णी यांचा संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी श्रींची प्रतिमा, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
पतसंस्थेच्या कामकाजाची प्रामुख्याने S.L.R, CRAR रजिस्टरची माहिती प्रत्यक्ष रजिस्टरचे अवलोकन करून आयुक्त साहेबांनी केली. संस्थेची वैशिष्टे जाणून घेतली. वसुली पाठपुरावा, कर्ज धोरण, रेकॉर्ड कीपिंग याबाबत प्रत्यक्ष माहिती आयुक्त महोदयांनी घेऊन संस्थेच्या कामकाजाबाबत प्रशंसोद्गार काढले. नेटके कार्यालय पाहूनही खूप सकारात्मक वाटले अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. आपण अधिकारी कोथमिरेसह लवकरच स्वरूपानंद पतसंस्थेला परत भेट देऊ आणि अधिक तपशीलवार संस्थेचे अवलोकन करू. कारण इथे उत्तम कामकाज चालले आहे हे काम सर्वत्र व्हायला पाहिजे. अन्य संस्थांना प्रेरणा देणारे हे काम आहे असे सांगत संस्थेला शुभेच्छा दिल्या.