(रत्नागिरी / प्रतिनिधी)
हातखंबा येथील घरासमोरील मोरीच्या खड्ड्याला स्थानिकांचा विरोध असतानाही प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गुपचूप जेसीबी आणून घाईघाईने खोदाई केलेला पहिला खड्डा बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न रवी इन्फ्रा कंपनीच्या सुपरवायजरला हाताशी धरून अधिकारी करीत आहेत. काल रात्रीच्या सुमारास याठिकाणी दोन जेसीबी फक्तं चार ते पाच मिनिटांसाठी आले आणि खड्डा बुजवण्याचा प्रयत्न सुरु झाला. यावेळी विरोध करणारे स्थानिक नागरिक दाखल होण्यापूर्वी लगेच जेसीबी घेऊन सुपरवायजरने पळ काढला.
या भागातील जमिनीची उतरती दिशा लक्षात घेऊन जुनी मोरी ही रद्द करण्यात आली. याच जुन्या मोरीचे पाणी तिथूनच पुढे काढून प्रोजेक्ट प्लॅनिंग नुसार जो पहिला खड्डा खोदाई केला तेथील मोरीच्या मुखात जाणार आहे. परंतु प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घरासमोरच मोरी उभारण्याचा घाट घातला आहे. महामार्गामध्ये जमीन गेलेल्या जागेमालकाच्या सांगण्यावरून स्थानिकांच्या मुळावर उठणारा निर्णय घेण्यासाठी नेमके अधिकारी खुश कशाने झालेत? पावसाच्या पाण्याची व जमिनीच्या उताराची दिशा अचानक कशी काय बदलली? जुना खड्डा खोदून अचानक घरासमोर खड्डा कोणाच्या सांगण्यावरुन खोदाई केला? सरळ रेषेत जाणारे पाणी इकडून तिकडून पाईपलाईने काढून सरकारचा पैसा अधिकारी वाया का घालवतायत? असे सणसणीत सवाल तक्रारदार कांबळे यांनी आता उपस्थित केले आहेत. त्यामुळे संबधित अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय शंकाही उपस्थित होत आहे.
स्थानिकांचा संबंधित विभागाशी पत्रव्यवहार
या विषयाबाबत स्थानिक ग्रामस्थ कांबळे यांनी प्राधिकरण विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. यावर पाठपुरावा देखील सुरू आहे. यातील एका निवेदनात घरासमोरील मोरी हटविली नाही तर थेट आत्मदहन करण्याचा गंभीर स्वरुपाचा इशारा कांबळे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. परंतु महामार्ग प्राधिकरण विभागाने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे प्लॅननुसार खोदाई केलेल्या पहिल्या खड्ड्यात मोरीचे बांधकाम होणार की अधिकारी मनमानी करून घरासमोर मोरीचा घाट घालून वाद चिघळवणार? हेच पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
इतका अधिकाऱ्याचा खटाटोप कशासाठी व कोणासाठी?
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गुपचूप येऊन जुना खड्डा बुजवून इथे खड्डाच नव्हता असे दाखवण्याचा केविळवाणा प्रयत्न अधिकारी करतायत. अनिल सिंग, इंजिनीअर ललित या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार खपवून घेणार नाही. या दोन अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न वरीष्ठ अधिकाऱ्यांनीही करू नये. आम्ही इथे कित्येक वर्ष राहतोय, आम्हाला भौगोलिक स्थितीचा शहाणपणा या अधिकाऱ्यांकडून शिकण्याची गरज नाहीं. पाहणी केल्यावर जमिनीचा स्लोप कोणत्या खड्ड्यात जास्त आहे हे स्पष्ट दिसून येते. तसेच सरळ रेषेत पाणी जाणार आहे मग घरासमोरील खोदाई केलेल्या खड्ड्यात इकडून-तिकडून पाईप टाकून पाणी पास करण्याची गरज का भासतेय इतका सर्व अधिकाऱ्याचा खटाटोप कशासाठी व कोणासाठी?
– स्थानिक तक्रारदार कपिलानंद कांबळे