(रत्नागिरी)
शहरानजीच्या एमआयडीसी येथील प्रौढाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना बुधवार, १ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वा. घडली. बलवंत माहदेव चव्हाण (५०, रा. एमआयडीसी, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सकाळी ९ वा. ते साळवीस्टॉप झोपडपट्टी येथील पाण्याच्या टाकीजवळ बसले होते. त्यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर त्यांना कारवांचीवाडी येथील खासगी डॉक्टरकडे नेऊन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.