दशक तिसरे समास दहावा वैराग्य निरूपण
संसार म्हणजे महापूर आहे. त्यामध्ये डंख करू पाहणारे विषारी काळसर्प, जलचर राहतात. आशा ममता ही देहाची बेडी आहे. या महापुरामध्ये सुसरी लचके तोडून दुःखाच्या संकटात नेऊन सोडतात. अहंकाररूपी नाक उडवले जाते, पाताळात नेऊन बुडवले जाते, तेथून प्राणी सुटणे शक्य नाही. येथील कामरूपी मगरीची मिठी सुटत नाही, तिरस्कार कमी होत नाही, मद मत्सर कमी होत नाही. अशी संसाराची भूल पडलेली आहे. वासनारुपी धामण गळ्यात पडली असून ती वेटोळे घालूनभयानक जीभ लळलळा करीत वेटोळे घालून गरळ ओकत आहे. माथ्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन माझे माझे माझे असं म्हणत बुडत असताना देखील कुळाच्या अभिमानाने तो फुगतो.
भ्रांतीच्या अंधारात अभिमानरुपी चोरा कडून तो नागवला जातो. नंतर त्याला अहंकाराची भूतबाधा होते. जन्म-मरणाच्या आवर्तात पडलेले प्राणी वाहत जातात. ज्याने भगवंताला प्रेमाने हाक मारली, देवाचा धावा केला, त्यांना देव पुढे घालून पैलतीरावर नेतो. अन्य बिचारी वाहतच जातात. भगवंत भावाचा भुकेला आहे, भाव पाहून तो विरघळतो व संकटातून भाविकाचे रक्षण करतो. ज्याला भगवंत आवडतो, त्याला देवाचे साकडे पडते, त्या निजदासाचे संसारदुःख उडून जाते.
जे ईश्वराचे अंकित आहेत, त्यांना नीजसुखाचे सोहळे पाहायला मिळतात भाविक दैववान धन्य होत. जसा ज्याचा भाव तसा त्याचा देव. प्राणिमात्राचा भाव देव ओळखत असतो. त्याचा भाव मायीक असला जर देव महाठक होतो व त्याला जशास तसा प्रतिसाद देतो. जसे ज्याचे भजन तसंच त्याचं समाधान देतो. भावामध्ये किंचित न्यून असेल तर तो दुरावतो. आरशामध्ये आपले प्रतिबिंब जसे असते तसे दिसते तेच सूत्र परमेश्वरापाशी असते. जसे आपण करावे तसेच त्याने व्हावे, आपण त्याच्यापुढे डोळे वटारून पाहिले तर तोही टवकारून पाहतो. आपण भुवया ताणून रागाने पाहिले तर देवही क्रोधाने पाहिलं, आपण हसून त्याच्याकडे पाहिले तर तोही आनंदाने पाहतो. जसा भाव तसा देव जो त्याला जसा भजतो तसा तो प्रसन्न होतो.
परमार्थाच्या वाटेवर भक्तीच्या पेठा असून मोक्षाचा चौक तिथे लागतो आणि सज्जनांची संगत त्या ठिकाणी लाभते. भावपूर्वक भक्तिपूर्वक भजन करू लागतात त्यांना ईश्वर पावन करतो आणि भावार्थ बळामुळे त्यांचे पूर्वज येथील उध्दरतात. आपण स्वतः तरतात आणि लोकांच्याही उपयोगी येतात त्यांची कीर्ती श्रवण करून अभक्त देखील भावार्थी होतात. जे हरी भजनाला लागले, त्यांची जननी धन्य होय. त्यांनी जन्म सार्थ केला, त्यांची थोरवी काय वर्णावी? ज्यांचा भगवंत कैवारी आहे तो भगवंतच स्वतः दुःखापासून त्यांची सुटका करतो. अनेक जन्मांच्या शेवटी यातायात ज्याच्यामुळे चुकते त्या नरदेहामुळे भगवंताची भेट होते. म्हणून ज्यांनी परमेश्वराला दोडले ते भाविकजन धन्य होत. त्यांचे अनंत जन्मजन्मांतरीचे पुण्य फळास आले. आयुष्य ही रत्नपेटी आहे. त्यामध्ये भजनाची सुंदर रत्ने भरलेली आहेत. ती ईश्वराला अर्पण करून आनंद लुटावा.
हरिभक्त वैभवाने कनिष्ठ असला तरी ब्रम्हादिकापेक्षा तो वरिष्ठ आहे. तो अनासक्त असल्याने सदा सर्वदा संतुष्ट असतो. ईश्वराची कास धरून संसाराचे नैराश्य दूर केले त्या भाविकांना जगदीश सांभाळतो. ज्यांना संसाराचे दुःख हेच परमसुख वाटते असे संसारसुखाचे पढतमूर्ख आसक्त होतात, मात्र ज्यांचा ईश्वराप्रती जिव्हाळा असतो ते स्वानंद सोहळा बघतात त्यांचा ठेवा अक्षय असतो.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127