(खेड / भरत निकम)
दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, ‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, अशा घोषणा देत सकाळी ११ वाजता खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारात शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमा झाले होते.
मराठा आरक्षणासाठी जालना आंतरवली सराटी येथे मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन तीव्र चालू आहे. त्याबद्दल सकल मराठा समाज, खेडच्या वतीने उपोषणकर्ते व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. सर्व मराठा समाज त्यांना पाठिंबा देत आहेत. ‘मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र मराठा समाजातील काही नेते उलटसुलट वक्तव्य करुन समाजामध्ये संभ्रम निर्माण करुन वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. अशा नेत्यांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत’, असे सांगून जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणा देत जयजयकार केला.
यावेळी माजी पं.स.सदस्य प्रकाश मोरे, मनोज भोसले, प्रकाश गायकवाड, देवेंद्र मोरे, तालुका प्रमुख संदीप कांबळे, विष्णू कदम, सचिन निकम, महिला आघाडीच्या अंकिता बेलोसे, दापोलीचे ऋषिकेश गुजर आदींसह बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. ‘गरीब गरजवंत मराठा बांधवांना ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे, मराठा आरक्षणावर बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा जाहीर निषेध’, असे अनेकांनी बोलताना सांगितले.