(जयपूर)
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांचा पत्नी सारासोबत घटस्फोट झाला आहे. सचिन पायलट यांनी मंगळवारी टोंक विधानसभेच्या उमेदवारीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. पत्नीच्या नावापुढे दिलेल्या कॉलममध्ये त्यांनी ‘घटस्फोटित’ असे लिहिले आहे. तर पत्नीशी संबंधित इतर सर्व रकान्यांमध्येही ‘लागू नाही’ असे लिहिले आहे. मात्र, त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या दोन्ही मुलांची नावे लिहिली आहेत. सचिन पायलट यांनी २०१८ च्या विधानसभा निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नी सारा पायलटचे नाव लिहिले होते.
मात्र, दोघांमध्ये घटस्फोट कधी झाला, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. पण हे दोघे वेगळे झाल्याचे पहिल्यांदाच जाहीरपणे समोर आले आहे. आपल्या प्रतिज्ञापत्रात पायलट यांनी पत्नीचे नाव असलेल्या कॉलमसमोर ‘घटस्फोट’ असे लिहिले आहे. सचिन आणि सारा यांना दोन मुले आहेत. सचिन पायलट आणि सारा पायलट यांनी २००४ मध्ये लग्न केले होते. सारा या जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांची मुलगी आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फारुख अब्दुल्ला यांचा या लग्नाला विरोध होता तर पायलट यांचे कुटुंबही या नात्यावर सुरवातीला नाराज होते. फारुख अब्दुल्ला या लग्नाला उपस्थित राहिले नव्हते. सारा यांचे शिक्षण लंडनमध्ये झाले आहे. या दोघांचे लग्न तत्कालीन दौसाचे खासदार आणि सचिन यांच्या आई रमा पायलट यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाले होते.
सारा आणि सचिन यांचे जानेवारी 2004 मध्ये एका साध्या सोहळ्यात लग्न झाले. या लग्नाला फार कमी लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. सारा यांच्या कुटुंबाने म्हणजेच अब्दुल्ला कुटुंबाने या लग्नावर बहिष्कार टाकला होता. सचिन आणि सारा या दोघांचीही कुटुंबे राजकारणात सक्रिय आहेत. सचिन पायलट हे काँग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचा मुलगा आहेत. त्याच वेळी, सारा या जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची मुलगी आणि ओमर अब्दुल्ला यांची बहीण आहे. सारा यांचे आजोबा शेख अब्दुल्ला हे लोकप्रिय नेते होते. या लग्नात सर्वात मोठा अडथळा होता तो म्हणजे सचिन हिंदू आणि सारा मुस्लिम.
लंडनमध्ये भेट –
सचिन पायलट यांचा जन्म सहारनपूर, यूपी येथे झाला. सेंट स्टीफन कॉलेजमधून शालेय शिक्षण आणि पदवीनंतर, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए करण्यासाठी ते परदेशात गेले. 1990 पर्यंत सारा आपल्या कुटुंबासोबत काश्मीरमध्ये राहत होत्या. त्यानंतर घाटी येथे सुरू असलेल्या तणावामुळे फारुख अब्दुल्ला यांनी सारा यांना तिच्या आईसोबत लंडनला पाठवले. लंडनमध्ये सारा आणि सचिनची पहिली भेट झाली होती. सचिन आणि साराचे वडील दोघेही मित्र होते आणि एकमेकांच्या कुटुंबाशी परिचित होते. MBA करत असताना सचिनची साराशी मैत्री झाली. कालांतराने त्यांची मैत्री घट्ट होत गेली आणि नंतर प्रेमात रुपांतर झाले.
साराने सचिन यांची तिच्या आईशी ओळख करून दिली. साराच्या आई-वडिलांना सचिन सुरुवातीपासूनच आवडायचे. साराच्या कुटुंबीयांना त्यांच्या मैत्रीवर कोणताही आक्षेप नव्हता. मात्र, दोघांनाही एकमेकांसोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही. काही महिन्यांतच सचिन पायलट हे आपला अभ्यासक्रम पूर्ण करून भारतात परतले आणि सारा इंग्लंडमध्ये राहिली. दोघेही एकमेकांशी इमेल आणि फोन कॉल्सवरून बोलत असत.
अब्दुल्ला कुटुंबीयांनी लग्नावर बहिष्कार टाकला होता –
सचिन गुर्जर कुटुंबातून आला होता तर सारा सनातनी मुस्लिम कुटुंबातून होती. लग्नासाठी घरच्यांची संमती सहजासहजी मिळणार नाही हे दोघांनाही माहीत होते. अखेर सचिन यांनी आईला साराबद्दल सांगितले. सचिन यांच्या आईने हे नाते स्वीकारण्यास नकार दिला होता. सचिन यांचे संपूर्ण कुटुंब या नात्याच्या विरोधात होते. त्याचवेळी साराच्या वडिलांनी हे नाते स्वीकारण्यास नकार दिला होता. सचिन आणि साराचे नाते जगजाहीर झाल्यावर अब्दुल्ला यांच्याच पक्षातील काही आमदारही या संबंधाच्या विरोधात होते.