(खेड / भरत निकम)
कशेडी येथील वाहतूक पोलीस चौकीच्या पुढील भागात छोटेखानी हाॅटेल चालवणारा रवींद्र जाधव हा वारकरी संप्रदायात सक्रिय असे. त्याचा संपूर्ण परिवार हा वारकरी पंथात आहेत. एक भाऊ पक्वाज वाजवून कीर्तन, प्रवचन करतो. तर वडील हे वारकरी आहेत. मुंबईतील घाटकोपर भटवाडी भागात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नित्य सेवा करणारा हा परिवार आहे. तो अंमली पदार्थांच्या विक्रीत पडला कसा? असा प्रश्न कशेडी भागातील नागरिक एकमेकांना विचारत आहेत.
रवींद्र हा मध्यम वर्गीय कुटुंबातील असून तो मुंबई घाटकोपर येथे रिक्षा चालवून उदरनिर्वाह चालवी. कोविड काळात तो गावी आला आणि तेव्हापासून इथेच राहिला. इथल्या उदरनिर्वाह चालवायला महामार्गावर चहा, नाष्टा, जेवण असे छोटेखानी हाॅटेल उभारले. महामार्गावर वाहन चालक, प्रवासी यांना चहा, बिस्कीट, नाष्टा, जेवण तो पुरवत होता. अनेक वाहन चालक त्याच्या संपर्कात होते. यातूनच तो अमली पदार्थ विक्री करण्यात गुंतला गेला. यात त्याला चांगली मिळकत होती. पुढे हा धंदा वाढवला होता.
तो रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात येऊन गांजा खरेदी करुन तेथून तो कशेडीत नेवून अनेक संपर्कातील ट्रकचालक यांना विकत असे. गेली अनेक महिने तो रत्नागिरी जिल्ह्यामधील या भागातून अमली पदार्थ असलेला गांजा विकत घेऊन जाई. असाच दि. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी गांजा खरेदीकरिता आला होता. याची खबर पोलिस पथकाला मिळाली. या कारवाईत तो अलगतपणे सापडला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील इको गाडीसह इतर माल जप्त केला असून तपास प्रक्रिया सुरु केली आहे. तो गांजाची विक्री कशेडी भागात करत होता, अशी माहिती तेथील नागरिक देतात. रवींद्र हा गांजासारख्या नको त्या अमली पदार्थ विक्री धंद्यात फसला आणि शेवटी अडकलाच, अशी चर्चा कशेडी भागात सुरु आहे.