घर घेण्याची इच्छा झाल्यावर अनेकजण सर्वप्रथम वेबसाईटवर स्वस्तातील घर शोधण्याचे काम करतात. मात्र अशा लोकांसाठी महत्वाची बातमी आहे. वेबसाईटवरून घरांची माहिती घेताना सतर्कता बागळणे आवश्यक आहे. नाहीतर मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने स्वस्त घरांचे आमिष दाखवून अस्तित्वात नसलेली घरे दाखवून ग्राहकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या ठकसेन बिल्डराला अटक केली आहे.
सुमित वीरमनी दुबे (३०) असं अटक केलेल्या बिल्डरचे नाव आहे. तो वसईत राहतो. त्याने प्रसिद्ध वेबसाईटवर अस्तित्वात नसलेल्या इमारतींमधील सदनिका विक्री करून नागरिकांना लाखोचा चूना लावला आहे. आचोले पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे.
या महाठगाने टू स्टार रिअॅलिटी तर्फे महालक्ष्मी बिल्डर्स् ॲण्ड डेव्हलपर्स ही कंपनी तयार केली होती. महालक्ष्मी बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सच्या नावाने त्याने नो ब्रोकर, ऑनलाइन ओएलएक्स या वेबसाईटवर घरांची जाहिरात केली. बांधकाम सुरू असलेल्या इमारतींची छायाचित्रे अपलोड करून तो नागरिकांची दिशाभूल करायचा. अस्तित्वात नसलेल्या सदनिका नागरिकांना तो विकायचा. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर बँकेतून कर्ज घेऊन ती रक्कम परस्पर लंपास देखील करत होता.
आपण मोठे बिल्डर असल्याचं भासवून प्लॅट खरेदी करणाऱ्या लोकांना बांधकामाच्या वेगवेगळ्या साईट दाखवून आरोपी त्यांची फसवणूक करत होता. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी सुमित दुबे आणि त्याचा साथीदार शुभम ऊर्फ बाबा गणेश मिश्रा या दोघांना अटक केली आहे. आरोप नियमितपणे आपली नावेही बदलत असे. कधी सचिन पाटील, तुषार अशा नावांचा तो वापर करत होता. त्यांच्याविरोधात फसवणुकीचे विविध पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल झाल्याचे उघडकीस आले आहेत.