(खेड / भरत निकम)
शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या योगिता दंंत महाविद्यालय, खेडच्या सन २०१८-१९ या वर्षातील विद्यार्थ्यांचा दिक्षांत समारंभ उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते, दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि संस्थेचे पदाधिकारी योगेश कदम यांच्या हस्ते पालकमंत्री उदय सामंत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम उपस्थित होते.
पालकमंत्री यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि शैक्षणिक प्रगतीची माहिती जाणून घेतली. तद्नंतर विद्यापीठात अव्वल गुण प्राप्त करुन यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. या समारंभात या नाविन्यपूर्ण महाविद्यालयाची स्थापना केल्याबद्दल माजी मंत्री रामदास कदम, आमदार योगेश कदम आणि इतर संस्था चालक यांचे उद्योग मंत्री सामंत यांनी कौतुक केले. कार्यक्रमासाठी शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.