(राजापूर)
तालुक्यात विविध भागात विखुरलेल्या मराठा समाजबांधवांना एकत्रित करून राजापूर तालुका मराठा समाज सेवा संघाचे काम अधिक बळकट व प्रभावीपणे करण्याचा निर्धार रविवारी झालेल्या राजापूर तालुका मराठा समाजसेवा संघाच्या बैठकीत घेण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मात्र ते कायद्याच्या चौकटीत टिकणारे व कायमस्वरूपी मिळाले पाहिजे अशी भूमिकाही यावेळी उपस्थित मराठा समाजबांधवांनी मांडली.
प्रारंभी दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गेल्या वर्षभरात मृत्युमुखी पडलेले समाजबांधव, नेते, सैनिक यांना श्रध्दांजली वहण्यात आली. राजापूर तालुका मराठा समाज सेवा संघाची बैठक रविवारी मराठा बोर्डींग कार्यालयात मराठा समाज सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक गुरूवर्य शहाजीराव खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी व्यासपीठावर प्रकाश पवार, प्रकाश आमकर, मदन हजेरी उपस्थित होते.
गेले काही वर्षे मराठा समाज सेवा संघाच्या कामात काहीशी शिथीलता आली आहे. तर कोरोना काळानंतर मराठा समाज बांधवांची बैठकीही झाली नव्हती. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने आणि जोमाने मराठा समाज सेवा संघाचे काम अधिक गतीमान करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत प्रकाश पवार, प्रकाश आमकर, भरत ओगले, जगदीश पवार ठोसर, नरेंद्र मोहिते, विनायक कदम, विनोद पवार, एकनाथ लाड, प्रशांत पवार, राजन लाड, हर्षदा खानविलकर आदींनी आपले विचार मांडले व भविष्यात पुन्हा नव्या जोमाने मराठा समाज सेवा संघाचे काम बळकट करण्याचा प्रयत्न करूया असे आवाहन केले. मराठा समाज बांधवांना संघटीत करताना विद्यार्थी गुणगौरव, समाजबांधवांचे सत्कार व अन्य उपक्रम राबविण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. तर रखडलेल्या महसुल प्रशासनातील कामासाठी व धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कामासाठी सात सदस्यांच्या दोन समित्याही या बैठकी गठीत करण्यात आल्या. भविष्यात ज्या ज्या भागात मराठा समाज आहे, त्या भागातील समाजबांधव प्रतिनिधींनी सर्वांना संघटीत करून भविष्यात अधिकाधिक सभासद नोंदणी करून मराठा समाज सेवा संघ अधिक बळकट करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
याप्रसंगी बोलताना अध्यक्ष शहाजीराव खानविलकर यांनी मराठा समाज सेवा संघ ही अत्यंत जुनी आपली संघटना असून नवीन तरूण पीढीने आता यात सक्रिय सहभाग घेऊन समाजबांधवांना एकसंघ करून संघाचे काम पुढे जोमाने सुरू ठेवावे असे आवाहन केले. या बैठकीत तात्पुरत्या स्वरूपात प्रकश पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यकारणीही गठीत करण्यात आली. जुन्या कार्यकारणी सदस्यांसोबत ही कार्यकारणी काम करणार असून सर्व भागातील मराठा समाज बांधवांना एकसंघ करून मग एक कार्यकारणी निवड करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहिर करण्यात आले.
याप्रसंगी मदन हजेरी यांनी संघाच्या कार्यकारणी बदल व अन्य नोंदणीबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कामांची कशा प्रकारे पुर्तता करता येऊ शकते याबाबत मार्गदर्शन केले. कोकण आयडॉल पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जगदीश पवार ठोसर यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या बैठकीला मोठया प्रमाणावर मराठा समाज बांधव उपस्थित होते.