(मुंबई)
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला मोेदींचे हात बळकट करायचे आहेत. यासाठी महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा निवडून आणायच्या आहेत. पुढील विधानसभा निवडणुकीनंतरही राज्यात महायुतीचेच सरकार असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून दिली.
शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडला. या मेळाव्याला तुडुंब गर्दी जमली होती. या मेळाव्यात भाषण करताना शिंदे यांनी हिंदुत्वाचा सोडलेला विचार, मुख्यमंत्रिपदासाठी केलेले राजकारण, कोरोना काळातील भ्रष्टाचार अशा अनेक मुद्यांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर झोड उठवली. आझाद मैदानावर दसरा मेळावा घेण्याबद्दल ते म्हणाले की, आम्ही शिवतीर्थावर दसरा मेळावा घेऊ शकलो असतो. परंतु बाळासाहेबांचे विचार आणि ते बिनधास्त मुक्तपणे मांडण्याचे ठिकाण हेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे. पण ज्या शिवतीर्थावर बाळासाहेबांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हा नारा दिला, त्याच शिवतीर्थावरून आज ‘गर्व से कहो हम काँग्रेसी है, समाजवादी है, हिंदुत्वरोधी है’ अशी वक्तव्य केली जात आहेत.
हिंदुत्वाच्या विचारावरून उद्धव यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांनी दिलेला हिंदुत्ववादाचा विचार उद्धव ठाकरे यांनी स्वार्थ आणि खुर्चीसाठी सोडला. हे अतिशय दुर्दैवी आहे. ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या विचाराचे वाभाडे काढले, सावरकरांचा अपमान केला. त्यांना हे डोक्यावर घेत आहेत. त्यांना कुर्निसात करत आहेत. उद्या यांनी काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन केला तर आश्चर्य वाटायला नको. बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देऊन त्यांच्या पाठीत खंजिर खुपसण्याची बेईमानी यांनी केली आहे. उद्या हे एमआयएमच्या ओवेसीबरोबर युती करतील. हमास, हिजबूल, लष्कर-ए-तोयबा यांच्याशी गळाभेट घेतील. किती लाचारी? यांना शिवसैनिकांशी काही देणे-घेणे नाही. मी आणि माझे कुटुंब एवढेच ठाऊक आहे. या पापात सहभागी नाही याचे समाधान आहे. आता तुम्हीच सांगा, बाळासाहेबांचा विचार नाकारला त्यांचेच तळवे चाटणारे गद्दार की कोण गद्दार?
आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, मात्र हे सत्तेसाठी लाचार झाले. बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभं करून घेतलं नाही त्यांच्यासोबत हे गेले अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. आम्हाला एक फूल दोन हाफ म्हणणारे हे एक फुल एक हाफ, कधीही शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करतील असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे आल्यानंतर यांनी बँकेकडे 50 कोटी रुपये मागितले. बँकेने त्याला नकार दिले. त्यानंतर निर्लजाप्रमाणे त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले. आमच्यावर 50 खोक्यांचे आरोप करता आणि आमच्याकडेच 50 कोटींची मागणी करता. तुमचे प्रेम हे बाळासाहेबांच्या विचारावर नाही तर पैशावर आहे. त्यामुळे मी एका क्षणाचाही विचार न करता ते पैसे दिले.
बाळासाहेबांनी हिंदुत्त्वासाठी मतदानाचा हक्क गमावला. मात्र त्यांनी कधीच हिंदुत्त्व साेडले नाहीत. ज्यांनी बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क हिरावला त्यांच्यासोबत तुम्ही सोबत केली आहे. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी आम्ही कधीच तडजाोड करणार नाही. रक्ताचा नाते सांगणार्यांनीच बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घाेटला आहे. केवळ सत्तेसाठी त्यांनी हिंदुत्त्वाच्या विचाराशी तडजाोड केली.त्यांचा दसरा मेळावा नाही. त्यांचा शिमगा आहे. वर्षभर ते एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नावाने शिमगा करतात. त्यांनी त्यांचा मेळावा शिमग्या दिवशी घ्यावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
शिंदे यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले त्यावेळी पडद्यामागे घडलेल्या हालचाली सांगताना म्हटले की, एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार, पालखीत बसवणार असे ठाकरे यांनी म्हटले होते. परंतु मागचा-पुढचा कुठलाही विचार न करता हे महाशय टुणकन खुर्चीत जाऊन बसले. मला कुठे मुख्यमंत्री व्हायचेय असे म्हणत होते. परंतु पवार साहेबांकडे दोन माणसे पाठवून आपल्या नावाची शिफारस करायला लावली. 2004 पासून ते प्रयत्न करत होते. परंतु जुगाड होत नव्हता. हे सगळ्या नेत्यांना ठाऊक आहे. एकेका नेत्याचा तुम्ही काटा काढलात. मलाही खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात डांबण्याचा तुमचा इरादा होता. त्याच्या आधीच मी टांगा पलटी केला. मी गहाण टाकलेल्या शिवसेनेला सोडविण्याचे काम केले. मी गुन्हा केला का?
उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात भ्रष्टाचार केल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, कोरोनाच्या काळात तुम्ही घरी पैसे मोजत होता. खिचडीमध्ये पैसे खाल्ले, ऑक्सिजनमध्ये पैसे खाल्ले, डेडबॉडी बॅगमध्ये खाल्ले. हे पाप कुठे फेडाल. त्या काळात मी पीपीकीट घालून लोकांच्या भेटीला गेलो. बाळासाहेबांच्या विचारांचा झंझावात माझ्यासमोर दिसत आहे. मी आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ताच राहणार आहे. एका सर्वसामान्य शेतकर्यांच्या कुटुंबातील मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून तुम्हाला एवढा पाेटशुळ का उठला आहे? शेतकर्याच्या मुलाने हेलिकाॅप्टरमधून फिरु नये का? साेन्याचा चमचा घेवून जन्माला आलेल्यानेच मुख्यमंत्री व्हावे, असा नियम आहे का?, असा सवालही त्यांनी केला.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सध्या तापला आहे. त्याबद्दल बोलताना शिंदे यांनी शिवछत्रपतींच्या प्रतिमेसमोर गेले. त्यानंतर ते म्हणाले की, मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे. तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये. शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार. राज्यातील प्रत्येक समाज घटकाला आम्ही न्याय मिळवून देणार आहोत.
भाषणाच्या शेवटी त्यांनी महायुती सरकार आणि मोदी सरकारने लोकांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 45 जागा आम्ही जिंकू. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा आहे. नरेंद्र मोदी मुंबईत येतात तेव्हा यांना पोटदुखी होते. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू केले आहेत. तुम्ही काही केले तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचाच विजय होणार आहे.
मेळावे किंवा मोर्चाच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची अडचण असते. मात्र आझाद मैदानात वातानुकूलित गारेगार स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली होती. आमचीच मूळ शिवसेना असा दावा करणार्या शिवसेना शिंदे गटाला पक्षाचे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे. मात्र शिवसेनेचा वाघ मात्र सभेच्या ठिकाणी कुठेही नव्हता.
सभेला येणार्या हजारोंच्या गर्दीसाठी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जेवणाची सोय केली होती. यासाठी मैदानाबाहेरील एका कोपर्यात, पुलाव आणि खिचडी तयार होत होती. मैदानाच्या वेगवेगळ्या प्रवेशद्वारावर मंत्री आपल्या मतदार संघातून आलेल्या कार्यकर्त्यांची सोय व्यवस्थित व्हावी यासाठी उभे होते तर फॅशन स्ट्रीटजवळील ठिकाणी बाहेरगावाहून आलेल्या कार्यकर्त्यांची निवासाची सोय करण्यात आली होती. या सगळ्यावर यंदाही अफाट खर्च करण्यात आला होता.
शिंदे आणि ठाकरे गटाचा दसरा मेळावा वेगवेगळ्या मैदानांवर होता. मात्र, दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये कुठलाही संघर्ष होऊ नये, यासाठी 2493 पोलीस अधिकारी आणि 12,449 पोलीस अंमलदार कडक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. याशिवाय 6 अपर आयुक्त, 16 पोलीस उपायुक्त आणि 45 सहायक पोलीस आयुक्त मुंबईतील विविध भागात तैनात करण्यात आले होते.