(लखनौ)
देशात आणि विदेशातही नवरात्री आणि दुर्गापूजेचे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. आपल्याकडे सार्वजनिक गणेशोत्सवाचे भव्य मंडप, देखावे आणि आरास पाहायला मिळते; तशीच दुर्गापूजेचेही मंडप देशभरात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. दुर्गापूजेचे सर्वांत भव्य स्वरूप पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते. मात्र, आता जगातील सर्वांत महागडा दुर्गा पंडाल म्हणजेच मंडप बंगालमध्ये नव्हे तर, उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ शहरात पाहायला मिळत आहे. वृंदावनातील प्रसिद्ध प्रेम मंदिराची प्रतिकृती याठिकाणी बनवण्यात आली असून, या दुर्गा पंडालची गिनीज बुकमध्येही नोंद करण्यात आली आहे.
लखनौच्या जानकीपूरममध्ये हा दुर्गा पंडाल आहे. विशेष म्हणजे, या पंडालचे नाव 2019 नंतर सातत्याने गिनीज बुकमध्ये नोंद होत आली आहे. सर्वांत उंच व भव्य असा हा पंडाल असतो. पंडालचे संचालक सौरव बंदोपाध्याय यांनी सांगितले की, हा दुर्गापंडाल एकूण 47,210 चौरस फूट जागेत बनवला आहे. याची उंची 137 फूट आहे. यापूर्वी सर्वांत उंच देखाव्याचा विक्रम कोलकाता येथील पंडालच्या नावे होता. तो 125 फूट उंच होता.
हा पंडाल बनवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला. त्यासाठी 55 लाख रुपये खर्च करण्यात आले. वृंदावनातील प्रेममंदिराची हुबेहूब प्रतिकृती याठिकाणी बनवण्यात आली आहे. थर्माकोलला संगमरवरासारखे दर्शवण्यात आले. त्यासाठी 650 लिटर पेंटचा वापर करण्यात आला. केवळ बाहेरूनच नव्हे तर, पंडालचा अंतर्गत भागही प्रेममंदिराच्या अंतर्गत भागासारखा बनवला आहे. याठिकाणी भगवान शीकृष्णाचे मोहक दर्शन घडते. पंडालमध्ये दुर्गादेवीची सुंदर मूर्ती आहे. हा पंडाल गुरुवारपासून लोकांसाठी खुला करण्यात आला.