(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव- जाकादेवी येथे तक्षशिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नवीन शाखेचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले. यावेळी पालकमंत्र्यांच्या समवेत खालगाव सरपंच प्रकाश खोलये,प्रकाश साळवी, रत्नागिरी जिल्हा बँक संचालक रामभाऊ गराटे, रोहित मयेकर, बौध्दजन पंचायत समितीचे तालुकाध्यक्ष प्रकाश पवार पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन कांबळे,रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे , रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संचालक मधुकर टिळेकर, तक्षशिला पतसंस्थेचे उपाध्यक्ष अमोल सावंत, सेक्रेटरी प्रविण गुरव, रमेश कसबेकर, पोलिस पाटील संघटना जिल्हाध्यक्ष विश्वनाथ पाटील व विभाग प्रमुख प्रविण पांचाळ, बंड्या देसाई, विश्वास रहाटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तक्षशिला ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था मर्यादित पाली अंतर्गत नवीन शाखा जाकादेवी येथे सुरू करण्यात आली असून ही शाखा खालगाव रोड सिव्हिल हॉस्पिटल समोर रत्नेश्वर इलेक्ट्रॉनिक्स नजीक नव्याने स्थापन करण्यात आली आहे. या तक्षशिला पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उत्साह संपन्न झाला. पाली या मुख्य पतसंस्थेच्या अंतर्गत याआधी खेडशी, चांदेराई या ठिकाणीही पतसंस्थेच्या शाखा कार्यरत आहेत.
गेली २५ वर्ष या तक्षशिला पतसंस्थेने ग्राहकांची विश्वासार्हता पारदर्शक कारभारामुळे वाढविली आहे.पतसंस्थेचा विस्तार वाढला आहे. सभासद व कर्जदार मोठ्या प्रमाणावर आहेत.जनमानसात एक विश्वसनीय पतसंस्था म्हणून तक्षशिला पतसंस्थेने आपली ओळख निर्माण केली असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगून या पतसंस्थेच्या उलाढाली विषयी समाधान व्यक्त केले.पतसंस्थेच्या संचालक मंडळाचे भरभरून कौतुकही केले.
तक्षशिला पतसंस्थेच्या उत्तम कारभाराची अनेक स्तरांवर दाखल घेतली गेली आहे. त्यामुळेत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा दीपस्तंभ पुरस्कार , बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार, नवराष्ट्र आदर्श पतसंस्था पुरस्कार या पतसंस्थेला प्राप्त झाले आहेत. विशेषतः या पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गृहिणी, लहान मुलांकरिता बचत योजना, विशेष ठेव योजना,मुदत ठेव योजना ,मासिक ठेव योजना,ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा, पेन्शन ठेव योजना याशिवाय ग्राहकांना एटीएम सुविधा, सोनेतारण कर्ज सुविधा, वाहन तारण कर्ज सुविधा, अशा अत्यावश्यक सुविधा तक्षशिला पतसंस्थेच्या माध्यमातून जाकादेवी खालगाव पंचक्रोशीला पतसंस्थेच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या आहेत.
या पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन कांबळे, उपाध्यक्ष अमोल सावंत ,सेक्रेटरी प्रवीण गुरव सर्व संचालक मंडळ अतिशय चांगल्या प्रकारे कारभार सांभाळत असल्याची पोचपावती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिल्याने उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. या पतसंस्थेचा कारभार खूपच प्रशंसनीय व पारदर्शक असल्याचे सांगून उदय सामंत यांनी संस्थापक कै. तुकाराम पालकर यांचे स्मरण केले.
या पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून नितीन कांबळे आणि त्यांची संपूर्ण टीम यशस्वीपणे कार्यरत आहेत .ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या मदतीचा हात देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचे पतसंस्थेचे धडाडीचे चेअरमन नितीन कांबळे यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. जाकादेवीसारख्या मोक्याच्या ठिकाणी आपली पतसंस्था सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने शेतकरी वर्गातील नागरिकांना विविध योजना देण्यास बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले.