(मुंबई)
मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, हा माझा शब्द आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सांगितले. मराठा समाजातील लोकांनी आत्महत्या करणे ही बाब दु:खद आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. आरक्षणाच्या मुद्यात अनेक कायदेशीर बाबी असून, त्या पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या बांधवांनी थोडा धीर धरावा, असे आवाहन त्यांनी केले. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला इशारा 24 तारखेला संपणार आहे. त्यानंतर त्यांनी बेमुदत उपोषणाची हाक दिली.
मनोज जरांगे यांनी कालच्या सभेमध्ये त्यांची पुढची भूमिका स्पष्ट केली. आरक्षणासाठी काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटनाही समोर येत आहेत. या सर्व गोष्टींवर शिंदे यांनी भाष्य केले. आरक्षण देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मी दिलेला शब्द पाळेनच. अतिशय संवदेनशील घटना घडत आहेत. कुणीही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले.
कुणबी प्रमाणपत्रावर युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. ज्याप्रमाणे सरकाराने शब्द दिला, त्यानुसारच यावर काम सुरू आहे. आपल्या मराठा समाजातील तरुणांचा जीव स्वस्त नाही. या तरुणांनी त्यांच्या घरच्यांचा विचार करायला हवा. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे. त्यानुसार आम्ही मराठा समाजाला जास्तीत जास्त लाभ देण्याचे प्रयत्न करीत आहोत, असे शिंदे यांनी सांगितले.
मराठा समाजाला आर्थिक घटकांमधून आरक्षण दिले होते, ते उच्च न्यायालयात टिकले. पण सर्वोच्च न्यायालयात ते आंदोलन टिकू शकले नाही. पण आता क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली. त्यात मराठा आरक्षण प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. मागील वेळेस ज्या गोष्टी सुप्रीम कोर्टात मांडता आल्या नाहीत, त्या सर्व बाबी यावेळी मांडण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकार आरक्षणाच्या बाजूनेच आहे. कुठलेही खोटे आश्वासन आम्ही देत नाही. टिकणारे आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जे आर्थिक घटकांमधून आरक्षण दिले होते, ते उच्च न्यायायलयात टिकले, पण सर्वोच्च न्यायालायात टिकू शकले नाही. आता क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालायाने स्वीकारली आहे. मागील वेळेस ज्या गोष्टी मांडल्या गेल्या नाहीत, त्या सर्व बाबी यावेळी मांडण्यात येतील’ असे शिंदे यांनी स्पष्ट केले.