( आरोग्य )
शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेची (Calcium Deficiency) चिन्हे ओळखणे महत्त्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गंभीर समस्यांना बळी पडण्याची शक्यता असते. हाडे, सांध्यांच्या बळकटीसाठी कॅल्शियम महत्त्वाचे असते. त्याचबरोबर दात मजबूत होण्यासाठी देखील कॅल्शियमची आवश्यकता असते. तसंच कॅल्शियममुळे पेशी मजबूत होतात. रक्तसंचार सुरळीत होण्यात आणि मधुमेहाला आळा घालण्यात कॅल्शियम महत्त्वाची भूमिका निभावतो. अनेकजण कॅल्शियमची कमतरता जाणवू लागल्यावर कॅल्शियमयुक्त आहार किंवा सप्लीमेंट्स घेण्यास सुरुवात करतात. पण त्यासंबंधित पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे (Calcium Deficiency) आपण आजारांना बळी पडण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते, यासाठी शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू नये, यासाठी तुम्ही आहाराची काळजी घेणे आणि काही लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे.
कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे :
– कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायू आखडल्यासारखे वाटतात आणि दुखू लागतात. इतकंच नाही तर थकल्यासारखेही वाटते. थोडेसे काम केल्यावरही थकवा जाणवत असेल तर शरीरात कशाची तरी कमतरता आहे, हे जाणावे.
– कमजोर दात, नखं, केसांचे तुटणे, गळणे, कंबर दुखणे ही कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे आहेत.
– झोप न येणे, भीती वाटणे, टेन्शन येणे ही देखील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होऊ शकते.
– कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हात आणि पाय सुन्न होऊ शकतात. यामुळे पाय आणि हातांमध्ये मुंग्या येणे जाणवेल.
– कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायूमध्ये पेटके येतात आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात.
– कॅल्शियमच्या कमतरतेमुळे प्रौढांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. यामुळे हाडांची खनिज घनता कमी होते. त्यामुळे हाडे कमकुवत होऊन फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो.
– त्वचा कोरडी पडणे हे देखील शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण आहे. अशा स्थितीत त्वचेला ओलावा आणि निरोगी पीएच राखता येत नाही आणि त्वचेत कोरडेपणा येऊ लागतो.
– कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दात आणि हिरड्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
– कमी कॅल्शियम पातळीमुळे मुलांना मुडदूस रोग होण्याची शक्यता असते. यामुळे हाडांची मोडतोड होऊ शकते.
तसेच जर तुम्हाला सतत दातांसंबंधी समस्या येत असतील, थकवा जाणवत असेल, त्वचा कोरडी होत असेल आणि स्नायूत पेटके येत असतील तर ही कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे आहेत.
.कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा :
दूध –
शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी रोज ग्लास दूध प्या. शरीराला आवश्यक असलेली कॅल्शियम यातून मिळेल. त्याचबरोबर ऑस्टियोपोरोसिस या आजाराची संभावना कमी होईल.
चीज –
यातही कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात अन्य पोषकघटकही असतात. त्यामुळे प्रमाणात पण नियमित चीज खा.
हिरव्या पालेभाज्या –
पालेभाज्यात मुबलक प्रमाणात कॅल्शियम असल्याने शरीरातील कॅल्शियमची कमी भरून निघते. ब्रोकोली, पालक यांसारख्या पालेभाज्यांचा आहारात अवश्य समावेश करा.
सुकामेवा –
शरीरातील कॅल्शियमची कमी दूर करण्यासाठी रोज सुकामेवा खा. अक्रोड, बदाम, पिस्ता आणि काजू नियमित खाणे नक्कीच फायदेशीर ठरेल.
(Disclaimer. काही लक्षणे जाणवल्यास किंवा शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवताच डॉक्टरांच्या सल्लाशिवाय कोणतेही सप्लीमेंट्स किंवा औषधे घेऊ नका. )