(चिपळूण)
येथील ज्येष्ठ साहित्यिक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, ‘कृषिभूषण’ डॉ. तानाजीराव चोरगे यांनी लिहिलेल्या ‘हुरडा’ कादंबरीचे प्रकाशन रविवारी (दि. २२) सकाळी ११.०० वा. भोगाळे येथील माधव सभागृहात होणार आहे. प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक ‘लोटिस्मा’ वाचनालयाचे समन्वयक प्रकाश देशपांडे यांच्याहस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक-प्रकाशक राजीव बर्वे उपस्थित राहाणार आहेत.
डॉ. चोरगे हे बहुआयामी लेखक आहेत. त्यांची विविध विषयांवरील अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. समाजाला व्यथित करणारे अनेक विषय त्यांच्या लेखनात येतात. त्यांच्या नवीन प्रकाशित होणाऱ्या ‘हुरडा’ कादंबरीत त्यांनी असाच एक लसलसणारा विषय समाजासमोर आणला आहे. या कादंबरीतून त्यांनी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारावर विदारक भाष्य केले आहे. यापूर्वी याचवर्षी १२ एप्रिल २०२३ रोजी डॉ. चोरगे यांची ‘डोंगराने गाव गिळला’ ही कादंबरी प्रकाशित झाली होती. नुकताच डॉ. चोरगे यांना दिल्ली येथील इंटेलिक्चुअल पिपल्स फाउंडेशन यांचा बेस्ट बँक चेअरमन परफॉर्मन्स अॅवॉर्ड २०२२ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या प्रकाशन समारंभास उपस्थित राहाण्याचे आवाहन लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूणचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.