(चिपळूण)
शहर परिसरात कोणतीही परवानगी न घेता झळकणाऱ्या बेकायदेशीर बॅनरवर नगर परिषद प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे परजिल्ह्यातील कार्यक्रमाचे झळकत असणारे ते बॅनर अखेर काढण्यात आले आहेत.
शहरात विनापरवाना व बेकायदेशीररीत्या बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध तत्काळ दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मुकादम यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे दुसऱ्यांदा तक्रार करत या विषयाकडे लक्ष वेधले होते. नगर परिषद प्रशासन या बेकायदेशीर बॅनरधारकांविरुद्ध कोणतीही दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करत नाही. त्यामुळे सण, उत्सव, वाढदिवस, लोकप्रतिनिधींचे दौरे यासंदर्भात मोठमोठे बॅनर फलक बेकायदेशीररीत्या उभारले जात असल्याने शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचाही आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला होता.
या तक्रारीतून त्यांनी जिल्ह्याबाहेरील कार्यक्रमाचे बॅनर नगर परिषदेची कोणतीही परवानगी न घेता व जाहिरात शुल्क न भरता शहर परिसरात झळकत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत नगर परिषद प्रशासनाने शहरातील बेकायदेशीर असणारे परजिल्ह्यातील एका कार्यक्रमाच्या जाहिरातीचे बॅनर जप्त करत कारवाई केली.