( गणपतीपुळे/ वैभव पवार )
महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती रत्नागिरी यांच्या आदेशानुसार रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेत जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान कोविड – १९ च्या प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख उपस्थितीत व अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले.
अभियान ३ जानेवारी ते १२ जानेवारी २०२२ दरम्यान विविध उपक्रमाच्या माध्यमातून अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाची सुरुवात राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादनाने झाली. त्यानंतर या अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वाटदच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी, सुजाण पालकत्व, मुलींची सुरक्षा व सशक्तीकरण, प्रेरणा जिजाऊंची, वसा सावित्रीचा विषयावर आधारित निबंध स्पर्धा, गावातील यशस्वी महिलांच्या यशोगाथा आणि मुलाखती दरम्यान महिलांचा सन्मान, विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन, विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करणे, ऐतिहासिक घटनावर आधारित पोवाडा गायन व समुहगायन, आनंददायी आणि आरोग्यदायी शाळांतर्गत माधव अंकलगे यांच्या व्याख्यानाचे आयोजन आणि अभियानाच्या समारोप प्रसंगी मी जिजाऊ बोलतेय, मी आजची सावित्री यावर एकपात्री सादर करण्यात आल्या. तसेच या अभियानाच्या समारोप प्रसंगी इयत्ता चौथी व पाचवी मधील विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा परिधान करून आजच्या दिनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले.
या अभियानात आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत सोहम शशिकांत कुर्टे, श्रावणी महेश घवाळी, नियती नरेंद्र धनावडे, गौरी संदीप धनावडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले.
या अभियानाच्या विविध उपक्रमावेळी शाळा जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अप्पा धनावडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास बारगुडे, उपाध्यक्ष वैशाली कुर्टे, माजी सरपंच अनिकेत सुर्वे, बापू घोसाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती कदम, नारायण धनावडे, गोविंद डुमनर विश्वनाथ शिर्के, यांनी मार्गदर्शन केले.
अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार अधिकारी अनिता तोटावार, केंद्रीय प्रमुख अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे, उपशिक्षिक गोविंद डुमनर, अंगणवाडी सेविका सुजाता लोहार, अक्षरा शिर्के, अंगणवाडी मदतनीस समीक्षा घवाळी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.