(रत्नागिरी)
वर्क फ्रॉम होमच्या नादात आपल्या खात्यातील १० हजार रुपये गमावले. ही घटना १८ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२३ या कालावधीत हातखंबा येथे घडली आहे. या प्रकरणी विनित गुप्ता विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात सूर्यकांत भिकाजी बोंबले (३८, रा. हातखंबा, रत्नागिरी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
त्यानुसार, १८ ऑगस्ट २०२३ रोजी ते आपल्या मोबाईलवर फेसबुक अकाऊंट बघत असताना त्यांना त्यावर नटराज पेन्सील पॅकिंगवर जॉब फ्रॉम होम लेडीज अँड जेंटस अशी जाहिरात दिसली. त्यामध्ये दिलेल्या विपिन गुप्ताच्या मोबाईलवर त्यांनी संपर्क साधला असता त्याने नटराज पेन्सीलबाबत माहिती देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर नटराज पेन्सीलच्या मटेरीलयसाठी ९ हजार ९६० रुपये गुगलपे नंबरवरून आपल्या खात्यात जमा करुन घेतले. परंतु त्यानंतर मटेरियल न मिळाल्याने त्यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार केली आहे.