( गणपतीपुळे/वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे केदारवाडी येथील गणपतीपुळे गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ तथा सेवानिवृत्त माजी मंडळ अधिकारी मधुकर सिताराम पवार यांचे यांचे मंगळवार दिनांक 11 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी १२ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास गणपतीपुळे स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूसमयी त्यांचे वय 74 होते.
मधुकर सिताराम पवार यांनी अनेक वर्षे मालगुंड तलाठी सजा या ठिकाणी तलाठी म्हणून आपली सेवा बजावली होती. तसेच बरीच वर्षे मालगुंड येथे तलाठी म्हणून कामकाज केल्यानंतर त्यांची कोतवडे या ठिकाणी मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. यावेळी त्यांनी महसूल विभागात काम करताना एक सक्षम अधिकारी व सामान्य नागरिकांसाठी प्रामाणिक अधिकारी म्हणून आपला नावलौकिक प्राप्त केला होता. मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वांनाच प्रिय होते. आपल्या सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असत. गणपतीपुळे गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. ‘पवार काका ‘या नावाने संपूर्ण गणपतीपुळे परिसरात ते परिचित होते त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच गणपतीपुळे परिसरातील सामाजिक कार्यात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मत व्यक्त होत आहे. तसेच संपूर्ण गणपतीपुळे परिसरात त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
गणपतीपुळे येथील नामांकित क्रिकेट खेळाडू म्हणून आणि गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्याला वाचिवताना ‘देवदूत’ अशी आपली ओळख जनमानसात निर्माण केलेल्या सुरज मधुकर पवार यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे, मुलगी, सुन व नात आणि अन्य नातेवाईक असा मोठा परिवार आहे.