(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील ग्रामदेवता श्री चंडिका मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली असून वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्राच्या मध्यभागी असणाऱ्या ग्रामदेवता श्री चंडिका मंदिरामध्ये नवरात्र उत्सव या गावचे खोत विजय राजाराम भिडे यांच्या हस्ते घटस्थापना करून या उत्सवाला सुरुवात झाली. गणपतीपुळे गावामध्ये जसे ‘एक गाव- एक गणपती ‘अशी शेकडो वर्षांची प्रथा चालू असून त्याप्रमाणे गणपतीपुळे येथील श्री चंडिका मंदिरामधे ‘एक गाव- एक नवरात्र’ उत्सव ही प्रथा ३७वर्षांपासून चालू आहे .यामध्ये मंदिरामध्ये दुर्गा देवीची पार्थिव मूर्ती न आणता मंदिरामध्ये घटस्थापना करून हा उत्सव साजरा केला जातो. यावेळी संपूर्ण गाव उपस्थित असतो. सकाळी आठ ते नऊ देवीची पूजा पोथी पठण तसेच दिवसभर ग्रामदेवतेचे दर्शन चालू असते. सायंकाळी 7 ते 7 :30 या वेळेत गणपतीपुळे येथील वेगवेगळ्या यजमान आरतीसाठी उभे राहतात. सदरच्या आरतीला सुमारे सातशे ते 800 लोक हजर असतात.
गणपतीपुळे परिसरात एकच उत्सव होत असल्याने गावातील दांडिया प्रेमी मोठ्या प्रमाणात दांडिया खेळण्यासाठी हजर असतात. रात्री नऊ वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत दांडिया चालू असतो. त्यानंतर विविध करमणुकीचे कार्यक्रम पार पडतात. एकंदरीतच हा नवरात्र उत्सव गुण्यागोविंदाने येथील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करतात.
हा उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामदेवता श्री चंडिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष गोताड, खजिनदार आशीर्वाद सुर्वे, सचिव विनोद माने, सदस्य दिनेश ठावरे, योगेश पालकर, विजय भिडे (खोत), सुयोग भिडे यांच्यासह कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी उपसमिती मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत.