(लखनौ)
२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पहिला विजय मिळवला आहे. संघाने श्रीलंकेचा ५ विकेट राखून पराभव केला. लखनौच्या एकाना स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ ४३.३ षटकांत सर्वबाद २०९ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियन संघाने ३५.२ षटकांत ५ गडी गमावून २१० धावांचे लक्ष्य गाठले. सलामीवीर मिचेल मार्श आणि जोश इंग्लिसने अर्धशतके झळकावली, तर अॅडम झाम्पाने ४ बळी घेतले.
मिचेल मार्शने वनडे विश्वचषकातील पहिले अर्धशतक झळकावले आहे. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील १८ वे अर्धशतक देखील आहे. मार्शने ३९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ५१ चेंडूत १०१.९६ च्या स्ट्राईक रेटने ५२ धावा केल्या. त्याच्या खेळीत ९ चौकारांचा समावेश होता. वॉर्नर आणि स्मिथची २४ धावांवर विकेट गमावल्यानंतर मिचेल मार्शने लॅबुशेनसह ऑस्ट्रेलियन डावाची धुरा सांभाळली. दोघांनी ६२ चेंडूत ५६ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी मार्शच्या धावबादने तुटली. पहिल्या डावात नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ ४३.३ षटकांत २०९ धावांवर सर्वबाद झाला.
श्रीलंका संघाकडून पथुम निसांकाने ६१ आणि कुसल परेराने ७८ धावा केल्या. या दोघांशिवाय चरित असलंकाने २५ धावांचे योगदान दिले. उर्वरित फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियन संघाकडून अॅडम झाम्पाने ४ बळी घेतले. कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. ग्लेन मॅक्सवेललाही यश मिळाले.श्रीलंकेच्या डावातील मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू अॅडम झाम्पाने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने चार विकेट घेत श्रीलंका संघाच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. संध्याकाळी ४:४२ वाजता, श्रीलंकेच्या डावात ३२.१ षटके टाकण्यात आली तेव्हा पाऊस आला आणि खेळ थांबवावा लागला. सुमारे अर्धा तास प्रतीक्षा केल्यानंतर, षटके कापली गेली नसली तरी, ५:१० वाजता खेळ पुन्हा सुरू झाला.