(गणपतीपुळे / वैभव पवार)
भारताचे माजी राष्ट्रपती तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषद संचलित कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम मराठी कविता आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथील कवी केशवसुत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन मांडण्यात आले. या प्रदर्शनात विविध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे वर्णन करणारे तसेच राष्ट्रपुरुषांच्या चरित्रे आणि त्यांच्या कार्यावर आधारित ग्रंथांची मांडणी करण्यात आली होती.
या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, ज्येष्ठ अभियंते सागर चव्हाण, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडच्या अध्यक्षा नलिनी खेर, कार्याध्यक्ष शुभदा मुळ्ये, स्मारकाचे खजिनदार रवींद्र मेहेंदळे, सचिव विलास राणे, कोषाध्यक्षा उज्जवला बापट, सहसचिव रामानंद लिमये यांच्यासह स्वप्नेश राजवाडकर, कुमार डांगे उपस्थित होते.