(खेड)
रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक घोषित झाली असून ४ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी महापरिवर्तन सहकार आघाडी मैदानात उतरली आहे. परिवर्तन आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ खेड भरणा येथील श्री काळकाई देवीचे दर्शन घेऊन करण्यात आला. तसेच कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले.
यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (संभाजीराव थोरात गट ) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट) शिक्षक समिती सहकार गट, कास्ट्राईब शिक्षक संघटना, जुनी पेन्शन संघटना, दिव्यांग संघटना, उर्दू शिक्षक संघटना, केंद्रीय प्रमुख संघटना, शिक्षक मित्र गट संगमेश्वर, शिक्षक मित्र गट लांजा, शिक्षक भारती, पुरोगामी शिक्षक संघटना, प्रोटॉन संघटना या संघटना या महिपरिवर्तन आघाडीत आहेत. यावेळी होणाऱ्या मतदानातून महापरिवर्तन आघाडीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांनी व्यक्त केला.याप्रसंगी संचालक संतोष उतेकर, तालुका नेते विलास धामणे, अजित भोसले, शरद शिंदे, चंद्रकांत खेडेकर, अशोक मगदूम,अशोक मानकर, कृष्णा गंभीर,तुकाराम कोळी, विजय सकपाळ,प्रकाश कोदारे,राजाराम दरेकर, मंगेश झावरे,महिला आघाडी शितल देवळेकर,विनिता धामणे,ऋतुजा चांदीवडे उपस्थित होते.
या निवडणूकीत खेड तालुक्याचे उमेदवार म्हणून राजेंद्र चांदिवडे निवडणूक लढवत आहेत. चांदिवडे सध्या शिक्षक संघाचे अध्यक्ष असून त्यांचा लोक संपर्क चांगला आहे. क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. अतिशय संयमी आणि अभ्यासू व्यक्ती म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. तसेच मागील निवडणूकीत विजयी झालेले आणि गेली साडे सहा वर्षे खेड तालुक्याचे संचालक म्हणून काम केलेले संतोष उतेकर यांनी सर्व सभासदांना उत्तम सेवा दिली आहे. कोणत्याही सभासदाची अडचण होऊ दिली नाही. सर्वांना योग्य सन्मान आणि यथार्थ सेवा दिल्याने संघाच्या या कार्याचा फायदा चांदिवडे यांना होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ पाटील यांनी केले, तर अंकुश चव्हाण यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी महापरिवर्तन सहकार आघाडीतील संघटनांचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.