दशक 3 समास 2 स्वगुण परीक्षा नाम समास
समर्थ रामदास स्वामी महाराज सांगत आहेत, ‘संसार हेच दुःखाचे मूळ आहे. दुःखाची इंगळी डंख मारू लागते त्यामुळे तळमळ होते. मागे गर्भवस्थेची माहिती दिली. गर्भवासामध्ये दुःख झाले, ते बालक विसरळे. पुढे दिवसेंदिवस ते मोठे होऊ लागले. बालपणी त्वचा कोवळी असते, दुःख होतात, जीवाची तळमळ होते पण वाचा नसल्याने सांगता येत नाही. देहाला काही दुःख झाले, भूक लागली की बालक मोठमोठ्याने रडते पण त्याला काय होते काय हवे ते समजत नाही. आई वरवर कुरवाळते पण आतमध्ये काय दुखतंय ते समजत नाही. मातेला हे समजत नसल्यामुळे बालकालाही दुःख होते. मग ते स्फुंदून स्फुंदून रडते. माता कडेवर घेऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते तिला त्याची व्यथा समजत नसल्यामुळे खंत वाटते. नाना व्याधीची भीती वाटते. त्याला काही झाले का या शंकेने तिला दुःख वाटते का रडतोय? त्याला धक्का बसला का? काही झालं का? चटका बसला का, पडला का काही समजत नाही.
शरीराचे रक्षण करता येत नाही, बालकाला काही करता येत नाही काही चूक झाली तर त्रास होतो. नंतर पूर्वपुण्याईमुळे बालक मोठे होऊ लागले. मातेला ओळखू लागले. दिवसेंदिवस मग माता समोरून दिसली रे दिसली तर तो ओरडायला लागतो. त्यावेळी त्याला मातेसारखा दुसरं काहीच आवडत नाही. मातेशिवाय तो राहू शकत नाही. स्मरण झाल्यावर तिचा वियोग त्याला क्षणभरही सहन होत नाही. ब्रह्मादिक देव आले, किंवा लक्ष्मीने पाहिले तरीदेखील त्याच्या आईवाचून त्याला करमत नाही. मग ती माता कुरूप असो किंवा कुलक्षणी असो किंवा वाईट असो कशीही असली तरी तिच्यासारखे भूमंडळी कोणीही नाही. असे मातेविना ते मुल केविलवाणे होते. मातेविना त्याला सगळीकडे कमतरता वाटते. तिने रागवल तरी पुन्हा तिला तो मीठी घालतो. मातेच्या जवळ असताना सुख वाटते. तिने दूर करताच तळमळ होते. अशाप्रकारे माता त्यावेळी अतिप्रिय असते.
एखाद्या वेळेस मातेस मरण आले तर प्राणी पोरका होतो तो दुःखाने आई आई म्हणून झुरू लागतो. आई दिसत नाही म्हणून तो दीनवाणा होतो. केव्हातरी आई येईल अशी त्याला आशा वाटते. एखाद्या स्त्रीकडे पाहतो पण ती आपली आई नाही म्हणून म्हणून त्याचे मन हिरमुसले होते. तो दीन होतो. मातेच्या वियोगामुळे कष्ट होतात मनाला दुःख होते प्रकृती देखील अशक्त होते. एखाद्या वेळी माता वाचली तेव्हा तिची आणि लेकराची भेट होते. बाळ दिवसेंदिवस मोठा होतो. त्याचे बाळपण कमी होऊ होऊन तो मोठा होता तो शहाणा होत जातो. मग आई कुठे गेली तर तिची वाट पाहत राहतो. आणखी मोठा झाल्यावर त्याला खेळाचा छंद जडतो. मुलांचा कळप गोळा करून खेळ मांडतो. त्याच्यामध्ये आनंद-दुःख व्यक्त करतो. आई-वडील ममतेने काही शिकवतात ते त्याला काही आवडत नाही. त्याला मित्रांची संगत आणि खेळ यांचीच चटक लागते. मित्रांमध्ये खेळतांना त्याला आई आणि वडील आठवत नाही. आणि तिचे आई वडील आज अचानक आले की त्याला दुःख वाटते. खेळता खेळता अपघात होतो, कधी दात पडतात, कधी डोळा फुटतो, कधी पाय मोडतो, कधी वेड्यासारखा वागतो, कधी मस्ती येते, मग कधी देवी येतात, कधी गोवर येतो, कधी डोकेदुखी, कधी ताप, कधी पोट दुखत, वायूचा गोळा होतो, कधी भूत धडकतात, जलदेवता त्रास देतात, मुंजा, झोटींग, करणी, म्हसोबा वगैरेचा त्रास होतो. दुष्ट वेताळ ब्रह्मराक्षस चेटूक असे काहीतरी मागे लागतात.
कोणी म्हणतं विरदेव, कोणी म्हणतो खंडेराव, कोणी म्हणतो ब्रह्मसमंध. अशा तऱ्हेचा त्रास झाल्यावर कोणीतरी काहीतरी करणी केली, सटवाईचे नवस चुकले, अशाप्रकारे तरच कुतर्क केले जातात. कोण म्हणतात हे कर्मभोग आहेत त्यामुळे अंगी नाना रोग जडले. मग पंचाक्षर्याला बोलवतात मंत्र टाकतात. कोणी म्हणतो हा वाचत नाही. कोणी म्हणतात मरत नाही. अशाप्रकारे तो पापामुळे यातना भोगत राहतो. गर्भदु:ख विसरला तो त्रिविध तापाने पोळला गेला. संसार दुःखामुळे प्राणी कष्टी झाला.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127