(खेड / भरत निकम)
शहरातील पोलिस स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या सार्वजनिक स्वच्छ्ता गृहाच्यामागे राष्ट्रीयध्वजाचा चक्का फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
केंद्र सरकारने राबवलेल्या हर घर तिरंगा मोहिमेत गतवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य देशवासियांना आपापल्या घरात तिरंगा फडकवण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ध्वज आचारसंहितेमध्ये काही बदल करण्यात आले होते. तसेच सर्वसामान्य जनतेला राष्ट्रध्वज कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आले होते.
पोलिस स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या स्वच्छ्तागृहाच्या मागे कचरा फेकण्यात येतो. याच कचऱ्यात अंदाजे आठ ते दहा राष्ट्रध्वज टाकून देण्यात आले होते. विशेष म्हणजे सर्व सामान्य पक्षकार व पोलिस स्थानकातील अधिकारी व कर्मचारी या स्वच्छ्तागृहाचा नियमित वापर करतात. मात्र तरीही हे ध्वज कोणालाही उचलून बाजूला करावे, असे वाटले नाही या बद्दल संताप व्यक्त केला जात आहे. सोमवारी एका जागरूक नागरिकाला स्वच्छ्तागृहात गेल्यानंतर खिडकीमधून हा प्रकार निदर्शनास आला.
या घटनेची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्याने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी ११ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता यामध्ये तथ्य असल्याचे दिसून आले. तातडीने या बाबत माहिती देण्यासाठी पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांची भेट घेऊन सांगितले असता त्यांनी प्लास्टिकचे झेंडे असल्याचा सुरुवातीला दावा केला. मात्र तुम्ही झेंडे पाहिलेत का? असे विचारल्यानंतर पोलीस निरीक्षक भोयर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत घटनास्थळी पाहणी केली.
येथील प्रकारचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर भोयर यांनी कर्मचाऱ्यांना सांगून झेंडे ताब्यात घेतले. याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी भोयर यांनी विचारले असता, हा परिसर आमचा नाही हे इथे कोणी टाकले माहिती नाही. तुम्ही बातमी काय कोणत्याही विषयाची करू शकता, असे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. याबाबत दुर्लक्ष करण्याची भूमिका त्यांनी घेतली असल्याचे दिसले.
दरम्यान हा गंभीर प्रकार तहसिलदारांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी भेट घेण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयात भेट होऊ शकली नाही. मात्र तेथे उपस्थित असलेले नायब तहसिलदार सिनकर याना या घटनेची माहिती दिली. मात्र त्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतल्याचे त्याच्या एकंदरीत वागण्यातून आढळले. या सर्व प्रकारची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.