देशभरातून हजारो साईभक्त दररोज शिर्डीत येतात. यातील अनेक जण पेड दर्शनपास घेऊन दर्शन घेतात तर, अनेक जण आरतीच्या पाससाठी रांगेत उभे राहतात. याचाच फायदा अनेकदा काही एजंट घेतात व साई भक्तांची फसवणूक होते. या पृष्ठभूमीवर आता पेड दर्शनपास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य केले असून, जो साईभक्त पेड दर्शन पास घेईल किंवा ज्याला आरती करायची आहे, त्याच्याच नावाने ओळखपत्राची एन्ट्री करून पास दिला जाणार आहे.शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाचा व्हीआयपी दर्शनपास मिळवायचा असेल तर आता नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. दर्शनापास किंवा आरतीचा पास घेताना आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. दर्शनपासचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी साईसंस्थानने हा निर्णय घेतला आहे.
साईबाबांच्या दर्शनाला जगभरातील भाविक येतात. अनेकदा सामान्य दर्शन रांगेत असलेली गर्दी पाहून पेड दर्शनपास असा पर्याय निवडून अनेक जण पेडदर्शन पास घेतात व दर्शन करतात. आरती पास घेण्यासाठी सुद्धा अनेकदा भक्तांना रांगेत उभे राहावे लागत असते. मात्र, हे होत असताना काही एजंट साईभक्तांची आर्थिक फसवणूक करीत असल्याच्या तक्रारी साईबाबा संस्थानला प्राप्त झाल्या होत्या. साईबाबा संस्थानच्या ऑनलाईन पोर्टलवर या दोन्ही सुविधा असल्या तरी, अनेकदा या ठिकाणी पास मिळत नाही. त्यामुळे एजंट याचा फायदा घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिली आहे.
साईबाबांच्या व्हीआयपी दर्शनासाठीचे नियम पेड दर्शनपास व आरती पास साठी ओळखपत्र अनिवार्य, पेड दर्शनपाससाठी एकाचे ओळखपत्र तर इतरांचे नाव अनिवार्य, आरती पाससाठी आरतीला असणार्या सर्व सदस्यांचे ओळखपत्र अनिवार्य, ऑनलाईन दर्शनपास कोटा प्रतीतास 500 वरून एक हजार करण्यात आला असून sai.org.in या अधिकृत वेबस्थळावर पेड दर्शनपास व आरतीपास उपलब्ध होणार आहे. सामान्य दर्शन रांगेतून थेट प्रवेशासाठी नेहमीप्रमाणे कोणतीही अट नाही.