(मुंबई)
प्रसिध्द छायाचित्रकार हेमा आणि तिचे वकील हरेश भंबानी हत्या प्रकरणातील दोषसिद्ध आरोपी चित्रकार चिंतन उपाध्याय यांच्यासह चारजणांना दिंडोशी येथील सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चिंतन याला हेमा आणि तिच्या वकिलाच्या हत्येसाठी प्रवृत्त करणे आणि हत्येचा कट रचल्याच्या आरोपात न्यायालयाने बुधवारी दोषी ठरवले होते. तर प्रदीप राजभर, विजय राजभर आणि शिवकुमार राजभर या तीन आरोपींना हत्या, हत्येचा कट रचणे आणि गुन्हा केल्याचे पुरावे नष्ट केल्याच्या आरोपांत दोषी ठरवले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. वाय. भोसले यांनी मंगळवारी चिंतन आणि अन्य आरोपीच्या शिक्षेचा निर्णय सुनावताना त्यांना जन्मठेप सुनावली.
तत्पूर्वी, दोषी ठरवण्यात आल्यानंतर शिक्षेबाबतचे आपले म्हणणे न्यायालयात मांडताना चिंतन याने, माझे मन शुद्ध असून मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी निर्दोष आहे. असे असले तरी आपण दयेची याचना करणार नाही. न्यायालयाने आपल्याला दोषी ठरवले आहे. त्यामुळे, न्यायालय जी शिक्षा सुनावेल, ती स्वीकारण्यास तयार आहे, असे सांगितले होते.
दुसरीकडे, आरोपींनी शांत डोक्याने हत्येचा कट रचून तो अंमलात आणला. या दुहेरी हत्याकांडाने समाजमन हादरवून टाकले होते. शिवाय, समाजाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या वकिलावर आरोपींनी हल्ला केला. त्यामुळे, अशा हल्ल्याची गांभीर्याने दखल घेतली जाते हा संदेश समाजात जायला हवा, असा दावा करून सरकारी पक्षाने चिंतन याच्यासह प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या अन्य तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी केली होती.
त्यावर, चिंतन याला हत्येच्या कटात सहभागी असल्याबाबत दोषी ठरवण्यात आले आहे. त्याने प्रत्यक्ष हत्या केलेली नाही किंवा त्याच्याशी तो संबंधितही नाही. त्याचप्रमाणे, हे प्रकरण कोणत्याही प्रकारे दुर्मीळातील दुर्मीळ प्रकारात मोडत नाही. त्यामुळे, चिंतनसह अन्य आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली जाऊ शकत नाही, असा दावा आरोपींच्या वतीने करण्यात आला होता. चिंतनवगळता अन्य आरोपींनी शिक्षेत दया दाखवण्याची मागणी केली होती.