( खेड / भरत निकम )
येथील २३ वर्षीय तरुणी सोबत प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानंतर वारंवार मानसिक त्रास देवून तरुणीचे फोटो व्हायरल केल्याने तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता दि. १९ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दापोली तालुक्यातील कुंभवे सुतार वाडी येथील कृतीकेश किशोर झाडेकर याचे २३ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. मात्र संशयी स्वभाव असल्याने दोघांचे प्रेम संपुष्टात आले होते. यानंतर आरोपीत तरुणीला मानसिक आणि शारीरिक त्रास वारंवार देत होता. दोघांचे खासगी फोटो मित्र मैत्रिणी यांना सोशल मिडियावर पाठवून तरुणीची बदनामी सुरु केली होती. वेगवेगळ्या नंबर वरुन फोन करुन तो तरुणीला धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून ती तरुणी मुळगावी परतली होती.
गावात आल्यावर तो पुन्हा फोन करुन दमदाटी करत होता. तरुणीचा भाऊ, आईसह इतर नातेवाईक यांना आरोपी वेगवेगळ्या नंबर वरुन फोन करुन दोघांचेही खासगी फोटो व्हाॅटसअप वर पाठवत होता. या त्रासाला कंटाळून तरुणीने खेड पोलिस ठाण्यात जाऊन तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीचा तपास सुरु असताना आरोपीत याचा मोबाईल जप्त केल्यानंतर संपूर्ण वस्तुस्थिती समोर आल्यावर त्याला अटक केली. खेड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केल्यावर दि. १९ ऑक्टोबर पर्यंत आरोपीत यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.