(मुंबई)
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडन येथून महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. तीन वर्षांच्या करारावर ही वाघनखे महाराष्ट्रात आणली जाणार आहे. मात्र, हा निवडणूक स्टंट असल्याचा घणाघात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढला, हे सत्य आहे. हा दिग्विजय असल्याचे आम्ही मानतो. इतिहासाला कलाटणी देणारे ते अचाट असे साहस छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात अनेक हत्यारांचा वापर केला. भवानी तलवार, अफझलखानाला मारले ती वाघ नखे आणि लालमहालात शाहिस्तेखानाची बोटे छाटली त्या तलवारीचा आपण उल्लेख करतो. पण आमचे सरकार कधीपासून इतिहास संशोधक झाले आहे? स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना वाघनखांबाबत संशय आहे आणि तुम्ही संग्रहालयातील वाघनखे घेऊन ती शिवाजी महाराजांची असल्याचे दाखवत आहात. ही फसवणूक आहे. त्याला कोणताही आधार नाही, पुरावा नाही. अर्थात ती शिवकालीन असू शकतात, आम्हाला त्याबद्दल आदर आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. पण इतिहास त्यांनी वाचला पाहिजे.
भावनिक मुद्दे आणतात
2014 पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली भावनिक राजकारण सुरू आहे. तेव्हा मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असल्याचे होर्डिंग लावले होते. समुद्रातील शिवस्मारकही अद्याप अपूर्ण राहिले असून हे भावनिक राजकारण आता वाघनखांपर्यंत पोहोचले आहे. निवडणुका आल्या की भावनिक मुद्दे आणायचे, असे म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
जातिनिहाय जनगणनेची आवश्यकता
देशात जातिनिहाय जनगणनेची मागणी होत आहे. हा मोठा मुद्दा असून भाजप यापासून पळ काढत आहे.”इंडिया’ आघाडीच्या बैठकीमध्ये आम्ही हा मुद्दा मांडला होता आणि आघाडीतील सर्व घटक पक्षांनी याला समर्थन दिले. याची सुरुवात बिहारपासून झाली असून राजस्थानमध्ये जातिनिहाय जनगणना सुरू आहे. महाराष्ट्रातही मागणी जोर धरत आहे. हळूहळू संपूर्ण देशात जातिनिहाय जनगणनेचा विषय मार्गी लागेल. ही गरज आहे आणि याच्या समर्थनार्थ सर्व पक्ष समोर येत आहेत. हा निवडणुकीचा मुद्दा नाही, पण याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.