एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतानं पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. केएल राहुल आणि विराट कोहलीच्या झुंजार खेळीच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला. कठीण परिस्थितीत विराट कोहलीने ८५ तर केएल राहुलने नाबाद ९७ धावांची खेळी केली. या विजयासह भारतीय संघाने विश्वचषकाची विजयी सुरुवात केली. केएल राहुल याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताचा पुढील सामना अफगाणिस्तानसोबत ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने विश्वचषक 2023 मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. भारताविरुद्ध 200 धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना स्टार्कने डावाच्या पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इशान किशनला कॅमेरून ग्रीनकडे झेलबाद केले. ईशान गोल्डन डक ठरला. भारतीय फलंदाजाची ही विकेट घेताच स्टार्क वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात वेगवान 50 बळी घेणारा गोलंदाज बनला.
केएल राहुल याने कठीण परिस्थितीत भारताचा डाव सावरला. विराट कोहलीचा साथ देत भारताच्या डावाला आकार दिला. भारतीय संघाच्या विजयात राहुलने सिंहाचा वाटा उचलला. केएल राहुलने ९७ धावांची नाबाद खेळी केली. राहुलने ११५ चेंडूमध्ये ८ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ९७ धावांची खेळी केली. विराट कोहलीसोबत दीडशतकी भागिदारी केली. कोहली बाद झाल्यानंतर हार्दिकला साथीला घेत भारताला विजय मिळवून दिला.
सुरूवातीचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यातील विजयासह भारताने दोन महत्त्वाचे गुण मिळवले आहेत.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 49.3 षटकांत सर्वबाद 199 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारताने चार गडी गमावून 41.2 षटकात 201 धावा करत विजय साकार केला. विजयासाठी 200 धावांचा पाठलाग करताना या सामन्यात भारताची सुरूवात लाजीरवाणी झाली. भारताचे पहिले तीन फलंदाज (Rohit Sharma ,Ishan Kishan ,Shreyas Iyer) खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. इशान किशन खाते न उघडताच बाद झाला. स्टार्कने त्याला कॅमेरून ग्रीनकडे झेलबाद करत भारतीय संघास पहिला धक्का दिला. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात किशन बाद झाला. त्यानंतर जोश हेझलवूडने रोहित शर्माला विकेट्ससमोर पायचीत करत दुसरा धक्का दिला. रोहितने सहा चेंडूंचा सामना केला, मात्र एकही धाव काढता आली नाही. इशान आणि रोहितनंतर श्रेयस अय्यरही खाते न उघडताच बाद झाला. श्रेयसला जोश हेझलवूडनं डेव्हिड वॉर्नरकरवी झेलबाद केले.
मार्शने झेल नव्हे सामनाच सोडला…
3 बाद 2 अशा बिकट स्थितीतून कोहली व राहुल डाव सावरत असताना जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर डावातील आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कोहलीने पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला व त्याचा झेल उंच उडाला. यावेळी मिशेल मार्शने हा सोपा झेल सोडला व कोहलीला 12 धावांवर असताना हे जीवदान मिळाले. पुढे त्यानेच राहुलसह बाजी मारली. त्यामुळे मार्शच्या हातून हा झेल नव्हे तर सामनाच सुटला.
त्यानंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुल याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध संयमी खेळी करत भारताचा डाव सावरत भारताचा विजय निश्चित केला. चौथ्या विकेटसाठी दोघांनी 165 धावांची भागीदारी केली. भारताकडून राहुलने सर्वाधिक 115 चेंडूत नाबाद 97 धावा केल्या. त्यानं षटकार लगावत भारतीय संघाचा विजय साकार केला. राहुलने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्यापाठोपाठ विराटने 85 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. हार्दिक पंड्या 8 चेंडूत 11 धावा करत नाबाद राहिला. विराट कोहली 116 चेंडूत 85 धावा करून बाद झाला. जोश हेझलवूडने त्याला मार्नस लॅबुशेनकरवी झेलबाद केले. कोहलीने आपल्या डावात सहा चौकार लगावले आणि कोहलीने राहुलसोबत चौथ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. मात्र, तो सामना पूर्ण करू शकला नाही आणि त्याचे शतकही हुकले, पण टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन तो बाद झाला.
ऑस्ट्रेलियातर्फे जोश हेझलवूडने सर्वाधिक तीन आणि मिचेल स्टार्कने एक विकेट घेतली. भारताच्या पहिल्या तीन फलंदाजापैकी रोहित आणि श्रेयसला हेझलवूडने तर ईशान किशनला मिचेल स्टार्कनं बाद केलं.
An incredible 97* in the chase when the going got tough 👏👏
KL Rahul receives the Player of the Match award as #TeamIndia start #CWC23 with a 6-wicket win 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/rY7RfHM1Bf
— BCCI (@BCCI) October 8, 2023
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. बुमराहने टाकलेल्या चेंडूवर त्यांचा सलामीवीर मिशेल मार्श खाते उघण्यापूर्वीच परतला. हा झेल विराट कोहलीने अप्रतिमरीत्या घेतला. त्यानंतर डेव्हीड वॉर्नरने स्टीव्ह स्मिथच्या साथीत डाव सावरताना संघाचे अर्धशतक फलकावर लावले. वॉर्नर मात्र, स्थिरावलेला असताना 41 धावांवर बाद झाला. त्याने 52 चेंडूत 6 चौकार फटकावले.
अर्धशतकाच्या जवळ आलेला असताना स्मिथही बाद झाला. त्याने 46 धावांच्या खेळीत 71 चेंडूत 5 चौकार फटकावले. त्यानंतर मात्र, ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख फलंदाजांवर भारताच्या फिरकी त्रिकुटाने वर्चस्व राखले. जडेजाने त्यांची मधली फळी उध्वस्त केली. त्याच्या जोडीला कुलदीप यादव व रवीचंद्रन अश्विन यांनीही अफलातून भेदक मारा केला. मार्नस लेबुशेनने 27, ग्लेन मॅक्सवेलने 15 धावा करत थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र, अनावश्यक फटके मारत त्यांनी आपल्या विकेट फेकल्या. तळात मिचेल स्टार्क व कर्णधार पॅट कमिन्स यांनी उपयुक्त भागीदारी केली त्यामुळे ऑस्ट्रेलियाला भारतासमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान उभे करता आले.
कमिन्सने 24 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावताना 15 धावा केल्या. स्टार्कने 35 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार मारताना महत्वपूर्ण 28 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 3 गडी बाद केले. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. महंमद सिराज, हार्दिक पंड्या व रवीचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.