(पुणे)
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीवर प्रशासक असलेल्या विस्तार अधिकाऱ्याला 40 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लोहगड ग्रामपंचायतीमध्ये सोलार प्रकल्प कामाची ऑर्डर काढण्यासाठी विस्तार अधिकाऱ्याने 40, हजार रुपयांची लाच मागितली. सदर लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.5) मावळ पंचायत समिती कार्यालयात करण्यात आली. अंकुश किसन खांडेकर (वय 57 रा. मावळ पंचायत समिती ता. मावळ जि. पुणे) असे लाच प्रकरणी अटक केलेल्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार ठेकेदार यांना लोहगड ग्रामपंचायत हद्दीत सोलार प्रकल्प कामाची ऑर्डर निघाली होती. ती ऑर्डर देण्यासाठी विस्तार अधिकारी अंकुश खांडेकर यांनी तक्रारदार ठेकेदार यांना 40, हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात तक्रार केली असता, गुरुवारी मावळ पंचायत समिती कार्यालयात विस्तार अधिकारी अंकुश खांडेकर यांनी लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.