दशक दुसरे समास आठवा सद्विद्या लक्षणे
आता सद्विद्येची लक्षणे ऐकूया. ही अत्यंत शुद्ध लक्षणे विचारात घेतल्यास अंगामध्ये शक्तिशाली सद्विद्या येते. सद्विद्या असलेला पुरुष उत्तम लक्षणे असलेला असतो त्याचे गुण ऐकून परम संतोष वाटतो. भाविक, सात्विक, प्रेमळ, शांती, क्षमाशील, दयाशील, लीन, तत्पर, अमृताप्रमाणे गोड वचने बोलणारा. अत्यंत सुंदर आणि चतुर, अत्यंत सबळ आणि धीरोदात्त, अत्यंत संपन्न आणि उदार असा हा सद्विद्या असलेल्या पुरूष असतो. परमज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त, महा तपस्वी आणि अतिशय शांत, चांगला वक्ता, उदासीन असलेला सर्व काही जाणणारा. सगळ्यांविषयी आदर असलेला. श्रेष्ठ असला तरी नम्र असा हा असतो.
राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेकी, तरुण आणि नितीनेमाने वागणारा, वडीलधाऱ्यांना मानणारा, कुळधर्म कुळाचार पाळणारा, मोजका आहार घेणारा, कोणताही विकार नसलेला, धन्वंतरी प्रमाणे परोपकारी, ज्याच्या हाताला अपयश येत नाही असा, निराभिमानी कार्यकर्ता. गायक आणि विष्णूभक्त, वैभव असलेला आणि परमेश्वराचे भजन करणारा असा तो असतो. तत्त्वज्ञ आणि उदासीन, बहुश्रुत आणि सज्जन, मंत्री आणि सगुण नीतीवंत असा तो असतो. पवित्र, पुण्यशील, साधू, मन शुद्ध असलेला कृपाळू धर्मात्मा, कर्मनिष्ठ, स्वधर्म नीटपणे पार पाळणारा, निर्लोभी, केलेल्या वाईट गोष्टीचा पश्चात्ताप असणारा, परमार्थविषयी प्रीती व गोडी असलेला, सन्मार्ग दाखवणारा, सत्कृत्य करणारा, धारिष्ट असलेला, श्रुती-स्मृतीचे ज्ञान असलेला, विविध लीला करणारा, युक्तीवान स्तुती करण्यास पात्र, मतीस उतरणारा, परीक्षा घेणारा, दक्ष, धूर्त, योग्य, तार्किक, सत्य जाणणारा, नेमका, भेदक, चमत्कारिक असा तो असतो.
आदर सन्मान करणारा, तारतम्य जाणणारा, प्रसंग जाणून त्यानुसार वागणारा, एखाद्या गोष्टीचा कार्यकारणभाव ओळखणारा, चतुर, बोलका, सावध, साक्षेपी, साधक, वेदशास्त्र जाणणारा, उपनिषदे माहिती असलेला, अनुभवी, बोध करणारा असा तो असतो. पुरश्चरण करणारा, तीर्थक्षेत्री वास करणारा, दीर्घकाळ व्रत करणारा, शरीराला कष्ट देणारा, उपासक, निग्रह पाळणारा असा तो असतो. सत्यवचनी, शुभ वचनी, कोमलवचनी, एक वचनी, निश्चयात्मक बोलणारा, नेहमी सुखात्मक बोलणारा असा तो असतो. वासना तृप्त झालेला सखोल योगी, भव्य सुप्रसन्न, विरागी, सौम्य, सात्विक, शुद्धमार्गी, निष्कपट, निर्व्यसनी, गुणग्राहक, संगीताची जाण असलेला, लोकांचा संग्रह असलेला, तरीदेखील कोणाकडून कोणतीही अपेक्षा नसलेला, आर्जवी, सर्व प्राणिमात्रांची मैत्री असलेला, चांगल्या मार्गाने धन मिळवलेला, सन्मार्गाने स्त्री मिळवलेला, अंतकरण शुद्ध असलेला, शुद्ध प्रवृत्ती असलेला, शुद्ध निवृत्ती असलेला, सर्व काही शुद्ध असलेला, मित्र म्हणून दुसऱ्याचे हित पाहणारा, दुसऱ्याचा शोक हरण करणारा, ज्याच्या वाणीमध्ये माधुर्य आहे असा, संरक्षण करणारा, जगाचा मित्र असलेला, पुरुषार्थ पाळणारा, संशयाचे निवारण करणारा चांगला वक्ता, ज्ञाता, चांगला श्रोता, कथा निरूपण करताना शब्दार्थ उलगडून सांगणारा, विवादरहित संवाद साधणारा, निसंग, निरूपाधिक, क्रोध न करणारा, वाईट इच्छा नसलेला, मत्सर न करणारा, निर्दोष, विमलज्ञानी, निश्चयात्मक, समाधानी आणि भजन करणारा. सिद्ध असूनही नियमित साधन करणारा, सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप, हास्यरूप, ऐक्यरूप, आत्मरूप, भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, सत्यवंत, क्रियावंत, विचारवंत, यशवंत, कीर्तिवंत, शक्तीवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्कृत्य करणारा, विद्यावंत, कलावंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत, कुळवंत, शुचिश्मंत, बलवंत, दयाळू. युक्तीवंत, गुणवंत, वरिष्ठ, बुद्धिवंत, अत्यंत धारिष्ट असलेला, दिक्षावंत, सदासंतुष्ट, निस्पृह विकरागी, असे हे उत्तम गुण म्हणजे सद्विद्येचे लक्षण आहे. त्याचा अभ्यास व्हावा म्हणून थोडक्यात सांगितले. रूप लावण्याचा अभ्यास करता येत नाही. सहज गुण वर्णन करता येत नाहीत. त्यामुळे काही गुण प्रयत्न करून प्राप्त करावे लागतात. अशा प्रकारची सद्विद्या चांगली असून ती सर्वांपाशी असावीच मात्र विरक्त पुरुषाने विशेषत्वाने अभ्यासली पाहिजे.
इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे सद्विद्या निरूपण नाम समास अष्टम समाप्त.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127