(हॉंगझोऊ)
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून दमदार कामगिरी सुरू आहे. भारताने काल ३ सुवर्ण, ५ रौप्य आणि ४ कांस्य पदकांसह १२ पदकांची कमाई केली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत ८१ पदकांची कमाई केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. या स्पर्धेत जकार्ता येथील स्पर्धेचा विक्रम भारताने मोडीत काढला. जकार्ता येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ७० पदके पटकावली होती. भारताने आतापर्यंत पटकावलेल्या ८१ पदकांमध्ये १८ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ३२ कांस्य पदकांचा समावेश आहे.
आशियाई खेळांत आज सुरुवातीलाच भारताने सुवर्णपदकाची कमाई केली. तिरंदाजीच्या कंपाऊंड मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम आणि ओजस प्रवीण देवताळे या जोडीने दक्षिण कोरियाच्या सो चेचान आणि जू जेहून या जोडीचा अंतिम फेरीत १५९-१५८ अशा फरकाने पराभव केला. यामुळे आशियाई खेळांत भारताच्या नावावर १६ वे सुवर्णपदक नोंदवले गेले. यासोबतच पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटरमध्ये भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. मुहम्मद अनस, अमोज, मुहम्मद अजमल आणि राजेश यांनी भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. यासोबतच भारताचा आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत गोल्ड मिळवले.
नीरज चोप्राशिवाय भारताचा किशोर जेना यानेही दमदार परफॉर्म केला. रौप्यपदक पटकावत तो पॅरिस ऑलम्पिकमध्ये पात्र झाला. तसेच भारताच्या महिला संघाने ४ बाय ४०० मीटर रिले स्पर्धेत दमदार कामगिरी करत आणखी एका रौप्य पदकाची भर घातली. भारताच्या ऐश्वर्या, प्राची, शुभा आणि विथ्या यांनी शानदार कामगिरी करत रौप्य पदकावर नाव कोरले. तसेच भारताचा कुस्तीपटू सुनिल कुमारने ८७ किलो वजनीगटात रौप्य पदक जिंकले. त्याने कझाकिस्तानच्या अटबेकचा पराभव केला. भारताचे हे कुस्तीमधील या स्पर्धेतील पहिले पदक ठरले. याशिवाय भारताने बॉक्सिंग आणि रेसलिंगमध्ये १-१ कांस्य जिंकले आहे.
बीडचा अविनाश साबळे याने आणखी एक पदक पटकावले आहे. त्याने ५ हजार मीटर स्पर्धेत रौप्य पदक मिळवले. याआधी त्याने सुवर्णकामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारताने ८१ पदके जिंकत चौथे स्थान कायम ठेवले आहे. चीन १६७ सुवर्ण पदकांसह एकूण ३१० पदकांसह अव्वल स्थानावर आहे तर जपान ३७ सुवर्णपदकांसह १४७ पदके जिंकत दुस-या क्रमांकावर आहे.