(नवी दिल्ली)
70 हजारांहून अधिक लोकांनी आयुष्मान भव मोहिमेंतर्गत अवयव दान करण्याचे वचन दिले असून यात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले. महाराष्ट्रातून सर्वाधिक अवयव दान प्रतिज्ञापत्रे प्राप्त झाली असून त्यापाठोपाठ तेलंगणा, कर्नाटक व आंध्रप्रदेश या राज्यांचा क‘मांक लागतो. शेवटच्या टप्प्यातील लाभार्थ्यांसह प्रत्येक इच्छित लाभार्थ्यांना आरोग्य सेवा प्रदान करणे आहे, हाच या मोहिमेचा उद्देश आहे.
आयुष्मान भव मोहीम 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुरू केली आणि 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत ‘सेवा पंधरवडा’ दरम्यान राबविण्यात आली. 63.8 लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड तयार करण्यात आले आहेत, तर 1 कोटी 13 लाख 41 हजार 303 आयुष्मान भारत आरोग्य खाते (एबीएचए) आयडी तयार करण्यात आले आहेत. ‘सेवा पंधरवडा’ दरम्यान आरोग्य व निरोगीपणा केंद्रावर 2 लाख 69 हजार 422 आरोग्य मेळावे आयोजित करण्यात आले आणि सुमारे 161 लाख लोकांनी मोफत निदान सेवा व औषधांचा लाभ घेतला आहे. याशिवाय सामुदायिक आरोग्य केंद्रांवर 9,970 आरोग्य मेळावे आयोजित करण्यात आले होते, ज्यात 17 सप्टेंबरपासून 22.9 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
सामुदायिक आरोग्य केंद्रांवर, 5,506 मोठ्या शस्त्रक्रिया व 25,716 लहान शस्त्रकि‘या करण्यात आल्या, तर 52,370 मोठ्या आणि 32,805 लहान शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात आले. मोहिमेचा एक भाग म्हणून 14,157 रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून 2 लाख 27 हजार 974 युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. याशिवाय 1 लाख 8 हजार 802 आयुष्मान सभा झाल्या आहेत.