(कोल्हापूर)
बिल पास करण्यासाठी एक लाख दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना जिल्हा क्रीडा अधिकारी हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. अ श्रेणी तील अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने क्रीडा क्षेत्रासह अन्य विभागातील शासकीय अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर विश्वनाथ साखरे असे लाच घेताना जाळत सापडलेल्या क्रीडा अधिकाऱ्यांचे नाव आहे. साखरे यांनी ८ लाख ८९ हजार २०० रुपयांचे बिल पास करण्यासाठी पंधरा टक्के लाच मागितल्याचे आणि तडजोडीअंती १ लाख १० हजाराची रक्कम स्वीकारताना चंद्रशेखर साखरे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यांच्या कार्यालयात मंगळवारी (दि. ३) दुपारी ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंध पथकाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. तक्रारदार हे वेगवेगळ्या सरकारी विभागास साहित्य पुरवठा करण्याचे काम करतात. त्यांनी ऑनलाईन महा टेंडर वरती कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयास आवश्यक असलेले साहित्य हे ऑनलाइन महा टेंडर वरती आलेल्या जाहिरातीनुसार पुरवले होते. सदर साहित्याचे एकूण बिल हे 8,89,200/- रुपयाचे झाले होते. सदर बिल मंजूर करण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे वरील बिल रकमेच्या अंदाजे 15 टक्के प्रमाणे लाच मागणी करून तडजोडीअंती 1,10,000 /-₹ लाचेची मागणी करून ती लाच रक्कम आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडून स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी विरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरू आहे.