(संगमेश्वर / प्रतिनिधी)
पाच दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडलेल्या निनावे- नारकरवाडी (ता. संगमेश्वर) प्रौढाचा मृतदेह सप्तलिंगी नदीपात्रातील कड्याच बांधन येथे सापडला. अनिल शंकर नारकर (४०) असे त्याचे नाव आहे.
निनावे नारकरवाडीतील अनिल नारकर हे २५ सप्टेंबर रोजी लघुशंकेसाठी घरातून बाहेर पडले होते. ते पुन्हा घरी न परतल्याने घरातील मंडळींनी सर्वत्र शोधाशोध घेतला, तसेच अनेक ठिकाणी चौकशीही केली. तरीही त्यांचा थांगपत्ता न लागल्याने, त्यांचा भाऊ अनंत नारकर यांनी साखरपा दूरक्षेत्रात याबाबत फिर्याद दिली होती.
त्यांचा शोध सुरू असतानाच, निनावे येथील ग्रामस्थांना कड्याच बांधन येथील नदीपात्रात त्यांचा मृतदेह दिसला. याची माहिती साखरपा पोलिसांना देण्यात आली आली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला. हा मृतदेह अनिल नारकर यांचा असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली साखरपा पोलिस करत आहेत.