(रत्नागिरी)
कंपनीला सुट्टी असल्याने रत्नागिरी शहरातील भगवती बंदर येथील ब्रेक वॉटर समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेलेल्या कामगाराचा पाण्यात पडून मृत्यू झाला. ही घटना १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:४० वाजण्याच्या दरम्यान घडली. अल्लाउद्दीन नासिरुद्दीन मॉडल (१९, रा. भाग्यमंतापूर, पश्चिम बंगाल) असे त्याचे नाव आहे.
अल्लाउद्दीन मॉडल हा रत्नागिरीतील एका फिश कंपनीत कामाला होता. रविवारी कंपनीला सुट्टी असल्याने तो मित्रांसोबत रत्नागिरी शहरातील भगवती बंदर येथील ब्रेक वॉटर समुद्रकिनारी सायंकाळी फिरण्यासाठी गेला होता. किनाऱ्यावर फिरत असताना तो समुद्राच्या पाण्याजवळ गेला. त्याच वेळी समुद्राच्या उंच लाटेने त्याला पाण्यात ओढले. त्यानंतर तो समुद्राच्या पाण्याबरोबर वाहत गेला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे ग्रामस्थ धावत आले.
याबाबत त्याच्या कंपनीतील सहकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर सर्व जण तिथे पोहोचले. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अल्लाउद्दीन याला बाहेर काढले. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.