(सोलापूर)
स्मार्टफोनसाठी बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आई वडिलांकडे हट्ट केला. मात्र, मुलाचा हट्ट पूर्ण न झाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. आकाश राजकुमार पुजारी (वय 18 रा. कुसुर तालुका दक्षिण सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने फोनसाठी गळफास घेत आपलं जीवन संपवलं. स्मार्टफोनसाठी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर येताच सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात याबाबत या फिर्याद देण्यात आली आहे.
मोबाईल घेण्यावरून तो घरात आई-वडिलांशी वाद घालत होता. आई वडील एक स्मार्टफोन घेऊन देऊ शकत नाही अशा विचाराने आकाश हा निराश झाला होता. रात्री आई-वडील झोपल्यानंतर त्याने घरापासून जवळच असलेल्या आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. रविवारी पहाटेपासून आई-वडिलांनी आकाशचा शोध घेतला असता तो शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेची माहिती मंद्रुप पोलिसांना दिली. मंद्रुप पोलीस घटनास्थळावर दाखल झाल्यानंतर आकाशचा मृतदेह खाली उतरविला. त्यानंतर मृतदेह मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. या घटनेची नोंद मंद्रूप पोलीस ठाण्यात झाली आहे.